मुंबई : सुभाष देसाई आमच्यासोबत आहेत ज्यांना वॉशिंग मशीनमध्ये जायचं आहे त्यांना जाऊ द्या असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे निष्ठावान नेते अशी ओळख असलेल्या सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई शिवसेनेत म्हणजेच एकनाथ शिंदेंसोबत जातो आहे. ठाकरे घराण्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. त्याबाबत आदित्य ठाकरे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. काही वेळापूर्वीच सुभाष देसाईंचा मुलगा भूषण देसाई यांनी शिवसेनेत म्हणजेच एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मला एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत आवडते. मी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय खूप आधीच घेतला होता आणि त्याची माहिती वडिलांना दिली होती असं आज भूषण देसाईंनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे आदित्य ठाकरे यांनी?
भूषण देसाई यांचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही. ज्यांना कुणाला वॉशिंग मशीनमध्ये जायचं आहे त्यांनी जरूर जावं. सुभाष देसाई हे आमच्यासोबत आहेत. चोवीस तास ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत असतात. ते आम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीत. भूषण देसाई यांचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही त्यांना जिथे कुठे जायचं आहे त्यांनी जावं असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.
भूषण देसाई यांनी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटासाठी हा खूप मोठा धक्का मानला जातो आहे. मात्र आदित्य ठाकरे यांनी हा आमच्यासाठी काहीही धक्का वगैरे नाही असं म्हटलं आहे. ज्यांना वॉशिंग मशीनमध्ये जायचं आहे त्यांना जाऊदे असं म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
शीतल म्हात्रे प्रकरणावरही आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणात माझ्या मित्राला ताब्यात घेण्यात आलं आहे. तो लढतो आहे. लढत राहिल. महाराष्ट्रातले विविध प्रश्न बाजूला टाकले जात आहेत. भलतेच विषय समोर आणले जात आहेत असं म्हणत आदित्य ठाकरेंनी या विषयावर भाष्य केलं आहे.
आदित्य ठाकरेंबाबत काय म्हणाले भूषण देसाई?
आदित्य ठाकरेंनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं त्यावर मी काय बोलणार? मी खूप लहान आहे. तुम्ही जर माहिती घेतली तर तुम्हाला समजेल की माझा शिवसेनेशी संबंध आहे की नाही? असंही भूषण देसाईंनी म्हटलं आहे. तसंच माझ्या वडिलांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे मात्र मी काय करायचं ते मी ठरवलं होतं. ठाकरेंची शिवसेना आणि ही शिवसेना यांच्यात काय फरक आहे ते मला समजलं म्हणूनच मी एकनाथ शिंदेंसोबत आलो. मला हे वॉशिंग मशीन वाटत नाही, मी विकासाचं काम करणाऱ्यांसोबत आलो आहे असंही भूषण देसाईंनी म्हटलं आहे.