अंतराळ संशोधनाबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी, यासाठी जि.प. रत्नागिरीच्या शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील २७ विद्यार्थी इस्रो भेटीला नेले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी अंतराळातील जग पाहिले आहे. सर्वच विद्यार्थी प्रथम विमानात बसल्याने त्यांच्या चेहर्यावर वेगळा आनंद पाहायला मिळाला. त्याचबरोबर इस्त्रोच्या भेटीने हे विद्यार्थी भारावले आहेत.
खासगी शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा टिकवण्यासाठी सध्या जि.प. रत्नागिरीच्या शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याला यशही येत आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ होण्यासाठी पाया भक्कम करणे, अंतराळ संशोधनाबाबत जिज्ञासा निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टीकोन विकसीत करणे, नवनवीन तंत्रज्ञानाची ओळखी व्हावी, यासाठी अमेरिकेतील नासा आणि भारतातील इस्त्रो या संस्थांना गुणवंत विद्यार्थ्यांना भेट घडवण्याचा उपक्रम जि.प. रत्नागिरीने हाती घेतला असून याचा पहिला टप्पा पार पडला आहे.