
मंडणगड (प्रतिनिधी) दि. : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी बोरघर-उतेकरवाडी येथील शेतात ग्रामस्थांसोबत भातलावणीचा आनंद घेतला. या उपक्रमात ग्रामस्थ, प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, डॉ. संगीता घाडगे, डॉ. महेश कुलकर्णी आदी मान्यवर सहभागी झाले होते.
सुरुवातीला ग्रामस्थांकडून भातरोपे काढणे, भातासाठी शेत तयार करणे व भातलावणी कशा पध्दतीने लावणी करावी लागते याची सर्व स्वयंसेवकांनी माहिती करुन घेतली. त्यानंतर स्वयंसेवकांनी शेत नांगरुण घेतले व पारंपारीक पध्दतीने भाताची रोपे काढून भातलावणी करत भातलावणीचा आनंद घेतला.
यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण यांनी हा उपक्रम खरे तर स्वयंसेवकांमध्ये शेतीविषयक एक चांगला सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणारा ठरला असून ग्रामीण भागातील जीवनशैली अनुभवण्याची एक चांगली संधी आपल्याला लाभली आहे असे सांगितले तर प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांनी हा उपक्रम ग्रामीण भागातील जीवन समजून घेण्याचा आहे. अशा प्रकारचे समाजपयोगी व प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना अनुभव देणारे उपक्रम यापुढेही राबविण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमात उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, प्रा. संजयकुमार इंगोले, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक-स्वयंसेविका यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शेवटी डॉ. महेश कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
फोटो ओळी: M-10 भातलावणी करताना महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रामस्थ,
प्रभारी प्राचर्यासह प्राध्यापक वर्ग
मंडणगड प्रतिनिधी