संगमेश्वर / मकरंद सुर्वे- विद्यार्थ्याने गृहपाठ केला नाही म्हणून विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापिकेविरुद्ध तेर्ये जिल्हा परिषद शाळा नंबर 1 च्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी शाळा बंद आंदोलन पुकारत शाळेच्या पहिल्या दिवशी एकही विद्यार्थी शाळेत पाठविला नाही.
संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये येथील जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर 1 मधील विद्यार्थ्यांने गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून शाळेतील विद्यार्थी रुद्र आनंद घवाळी( इयत्ता तिसरी )याला शाळेच्या मुख्याध्यापिका नीलांजली चव्हाण यांनी मारहाण केली होती. तसेच शाळेतील आणखी काही विद्यार्थ्यांच्या मुख्याध्यापिका विरुद्ध तक्रारी होत्या याबाबत गावाचे ग्रामस्थ पालक आणि विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी नाईक आणि केंद्रप्रमुख सावंत यांनी चौकशी केली होती तसा अहवाल त्यांनी वरिष्ठ पातळीवर दिला होता मात्र याबाबत कोणतीही हालचाल न झाल्याने शेवटी ग्रामस्थांनी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देत या प्रकरणी सखोल चौकशी तसेच मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याचे मागणी केली होती. शनिवारी जिल्हा परिषद शाळेचा नवीन वर्षाचा पहिला दिवस होता मात्र त्यादिवशी ही मुख्याध्यापिका आल्याने आणि तक्रार देऊन कोणतीही कारवाई न केल्याने ग्रामस्थांनी आणि पालकांनी शनिवारी एकही विद्यार्थी न पाठवण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी पालक आणि ग्रामस्थांनी नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मात्र शाळेत एकही विद्यार्थी पाठवला नाही. तसेच मुख्याध्यापिका नीलांजली चव्हाण यांच्यावर कारवाई केल्याशिवाय एकही विद्यार्थी शाळेत पाठविणार नसल्याचे निवेदन शिक्षण विभागाला दिले आहे .
एका बाजूला पालक आणि विद्यार्थी इंग्रजी शाळेकडे वळत असताना चांगली विद्यार्थी संख्या असतानाही तेर्ये मराठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या प्रश्नाकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करत असल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.
फोटो -जिल्हा परिषद तेर्ये शाळा नंबर 1 च्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मुख्याध्यापिकेच्या मारहाणीचा असा निषेध व्यक्त केला तर शाळेतील वर्गामध्ये एकही विद्यार्थी हजर नव्हता.