मोरोक्कोमध्ये शक्तीशाली भुकंप; ८२० हून अधिक जणांचा मृत्यू; अनेकजण जखमी.

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | रबात (मोरोक्को) | सप्टेंबर ०९, २०२३.

मोरोक्कोमध्ये शक्तीशाली भुकंप झाला असून या भूकंपामुळे आतापर्यंत ८२० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास १५३ जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपात शेकडो घरे कोसळली असून भूकंपामुळे झालेला विध्वंस लक्षात घेता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनानं तात्काळ बचावकार्य सुरू केलं असून ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्यासाठी वेगाने बचावकार्य सुरू आहे.

उत्तर आफ्रिकेतील देश मोरोक्कोमध्ये पहाटे झालेल्या भूकंपानं मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवला आहे. मोरोक्कोमध्ये भूकंपानंतर अनेक इमारती कोसळल्या, ज्यामध्ये ८२० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भूकंपाची तीव्रता ६.८ असल्याचं सांगण्यात येत आहे. मोरोक्को प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मोरोक्कोच्या माराकेश शहरापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, माराकेशपासून ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजधानी रबातमध्येही त्याचा प्रभाव जाणवला आहे.

भारतीय वेळेनुसार, पहाटे ३ वाजून ४१ मिनिटांनी मोरोक्कोत भूकंप झाला. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आफ्रिकेत झालेल्या गेल्या १२० वर्षांतील हा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. USGS नं म्हटलं आहे की, १९०० पासून या भागातील ५०० किमी परिसरात एम-६ किंवा त्यापेक्षा मोठा भूकंप झालेला नाही. येथे एम-५ पातळीचे केवळ ९ भूकंप नोंदवले गेले आहेत.

माराकेशमध्ये राहणारे नागरीक ब्राहिम हिम्मी यांनी एजन्सीला सांगितलं की, भूकंपामुळे अनेक जुन्या इमारती कोसळल्या. लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आणि लोक घाबरुन सैरावैरा पळू लागले. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. ते म्हणाले की, लोक घाबरले आहेत आणि पुन्हा भूकंपाच्या भीतीने घराबाहेर पडले. भूकंपाशी संबंधित अंगावर शहारे आणणारे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शेअर केले जात आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page