प्रशांत यादव 24 तास तुमच्यासाठी काम करतील- जयंत पाटील ; जयंत पाटील यांनी मला निवडणूक लढविण्यासाठी पाठबळ दिले- प्रशांत यादव
चिपळूण- विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे. २०१४ पूर्वी केंद्राच्या उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा वाटा अधिक होता, तो दोन टक्क्यांनी घसरला आहे. दरडोई उत्पन्नामध्ये २०१६पासून महाराष्ट्र गुजरातच्याही मागे गेला आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे मोदी आणि शहा यांना घाबरतात. एक दोन नाही, तर १७ प्रकल्प गुजरातमध्ये गेले आहेत. महाराष्ट्राची अधोगती सुरू असून याला हे महायुतीचे सरकार जबाबदार आहे. गुजरातला महाराष्ट्र महायुती सरकारने आंदण द्यायचं ठरवलं आहे, नव्हे तर दिलाच आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे, असे खणखणीत प्रतिपादन शरद पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राशेजारी पटांगण येथे जयंत पाटील यांची महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली. यावेळी जयंत पाटील बोलत होते. या सभेला उमेदवार प्रशांत यादव, माजी आमदार रमेश कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, निरीक्षक बबन कानावजे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम, ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, काँग्रेसचे नेते सहदेव बेटकर, महिला नेत्या नलिनी भुवड, चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, स्मिताताई चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनोद झगडे, माजी पंचायत समिती सदस्य प्रतापराव शिंदे, शशिकांत मोदी, बशीर मुर्तुझा, उमेश खताते, मुराद आ, दर्शना शिंदे, चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल, निहार गुढेकर, सतीशअप्पा खेडेकर, दीपक विखारे, अविनाश केळकर रतन पवार पार्थ पवार श्रीनाथ खेडेकर, शिरीष काटकर, नवसि काझी, दीपिका कोतवडेकर, संकेत कदम, सावित्री होमकळस आदी उपस्थित होते.
सभेला संबोधित करताना जयंत पाटील यांनी म्हटले कि, काही वर्षांपूर्वी अर्थमंत्री असताना चिपळूण नागरी पतसंस्थेचे काम मी पाहिले. त्यानंतर पुन्हा एकदा आलो, तेव्हा वाशिष्ठी दुग्ध प्रकल्प पाहिला. हे दोन्हीही प्रकल्प पाहिल्यानंतर बाहेर पडलो आणि प्रशांत यादव यांचे नाव माझ्यासमोर आलं आणि प्रशांत यादव यांचा उदय झाला, महाविकास आघाडीला कसल्याही भानगडी नसलेल्या स्वच्छ चेहऱ्याचा उमेदवार मिळाला आहे. कोकणात आम्ही एकच जागा राष्ट्रवादी म्हणून चिपळूणची लढवत आहोत आणि आम्हाला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. शरद पवारांचा पक्ष भाजपने फोडला. शिवसेनेतील काही आमदारांनी गद्दारी केली. यामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. वाशिष्टी नदीची खोली वाढवावी, रुंदीकरण करावे, असा आमचा प्रयत्न होता, परंतु त्यानंतर महायुतीचं सरकार आलं आणि हे काम थांबलं. शंभर कोटी रुपये किमान या कामासाठी आवश्यक होते, मात्र विद्यमान आमदारांनी त्यासाठी प्रयत्न केला नाही. नऊ कोटी रुपये मीच मंजूर केले होते, त्यातील काही निधी आला आहे, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
शरद पवार यांनी ज्यांना मोठं केलं, त्यांना ज्यांनी सोडलं त्यांना येत्या 20 तारखेला उत्तर द्या आणि 24 तास तुमच्यासाठी प्रशांत यादव काम करतील, असा विश्वास मी यांच्यावतीने व्यक्त करतो, असंही जयंत पाटील यांनी या वेळी सांगितलं. यावेळी बोलताना माजी आमदार रमेश कदम यांनी वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून प्रशांत यादव यांनी दहा हजारहून अधिक शेतकऱ्यांना स्वावलंबी केले आहे, येत्या काळात 50 ते 60 हजार शेतकरी या डेअरीच्या माध्यमातून उभे राहतील, असा विश्वास व्यक्त केला. रोजगाराचा प्रश्न हा कोकणात गंभीर आहे आणि त्यासाठी प्रशांत यादव काम करीत आहेत. पंधरा-वीस दिवस मतदार संघात फिरलो, पण जुनी लोक आजही पवार साहेबांना मानणारी असून 1999 प्रमाणेच ही सर्व मंडळी पेटून उठली आहेत. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार केले गेले, राहुल गांधी यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली गेली, त्याचे उत्तर नक्कीच मतदार देतील, असा विश्वासही रमेश कदम यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार उद्योजक प्रशांत यादव यांनी सांगितले कि, आपल्याला खरंतर निवडणूक लढवायची नव्हती, परंतु खरं पाठबळ जयंत पाटील यांनी दिलं. हात धरून पवार साहेबांपर्यंत नेलं आणि त्यांच्यामुळेच आज मी उमेदवार म्हणून तुमच्यासमोर उभा आहे, असे टाळ्यांच्या कडकडात सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रात चिपळूणचा एकमेव मतदार संघ आहे की, जेथे महाविकास आघाडी एकसंध एकजुटीने काम करीत आहे, असेही त्यांनी जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिलं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. पवार साहेबांचा पक्ष ज्यांनी फोडला, त्यांना उत्तर देण्याची ही वेळ आलेली आहे, असेही त्यांनी सांगितले. गेल्या अडीच वर्षात विद्यमान आमदारांनी विकास केला असे सांगितले, तरीही इथे मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत. वाशिष्ठेतील गाळ काढण्यासाठी नऊ कोटी मंजूर झाले, परंतु पाच ते सहा कोटी रुपये मिळाले आहेत. ब्ल्यू लाईन रेड लाईनचा प्रश्न आजही कायम आहे, महाविकास आघाडीचे सरकार आल्यास टप्प्याटप्प्याने निधी आणून वाशिष्टी गाळमुक्त करू आणि चिपळूणला पूरमुक्त करू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पंधरा वर्षे मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होत नाही. महामार्ग पूर्ण झाला तर महाबळेश्वरपेक्षा अधिक संख्येने पर्यटक कोकणात येतील. त्याचबरोबर चिपळूण तालुक्यात तीन एमआयडीसी आहेत. देवरुख एमआयडीसीचा प्रश्नही असाच आहे, असे त्यांनी सांगितले. आज वार्षिक दुग्ध प्रकल्पाच्या माध्यमातून 11,000 शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा मार्ग आम्ही दिला आहे. भविष्यात चिपळूणला पूरमुक्त करणे व सरकारच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे, हे आपलं ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही विचारांची लढाई लढत आहोत. आपणही आपल्या सहकाऱ्यांना त्या पद्धतीने विचारांची लढाई लढायला सांगा, असा सल्लाही त्यांनी आमदार शेखर निकम यांचे नाव न घेता दिला. आमचा बाप शरद पवार आहे, हे मी यापूर्वी सांगितले आहे. आता शिवसेना आपल्याबरोबर आहे. असेही त्यांनी सांगितले. या मेळाव्याचे सूत्रसंचालन शाहीर शाहीद खेरटकर यांनी केले.