भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रत्ननगरीत…

Spread the love

मा. आमदार तथा भाजपा रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. बाळ माने.

महाराष्ट्र प्रवक्ता न्यूज | रत्नागिरी | ऑक्टोबर १०, २०२३.

श्री समर्थ रामदास स्वामी आपल्या दासबोधातून सकल समाजाला मार्गदर्शन करताना म्हणाले होते –
सामर्थ्य आहे चळवळीचे | जो जो करील तयाचे ||
परंतु तेथे भगवंताचे | अधिष्ठान पाहिजे ||

अनेक राष्ट्रनायकांच्या अविरत प्रयत्नांनी आणि कोट्यावधी भारतीयांच्या दृढसंकल्पाने भारताने स्वातंत्र्यलक्ष्मी संपादन केली. देशातील अनेक बुद्धिवंत मंडळींनी एकत्रितपणे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष संविधान निर्माण करून भारताला जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा सन्मान मिळवून दिला. संविधानाला व राष्ट्रीय प्रतिकांना आराध्य मानून प्रजासत्ताक गणराज्याची वाटचाल सुरु झाली. सन २०१४ मध्ये भारताच्या पंतप्रधानपदाची कमान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या हाती जनतेने सोपवली. एका राष्ट्रयोग्याच्या हातात देश सोपवताना जनतेने संपूर्ण बहुमत देत आपल्या अधिष्ठानाची जाणीवही मा. मोदीजींना दिली. या अधिष्ठानाचे स्मरण मा. मोदीजींनी कायम ठेवले आणि मागील ९ वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीवर आधारित सरकारचे परिचालन केले.

‘भारतीय असंतोषाचे जनक’ लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे जन्मस्थान रत्नागिरी. कविवर्य केशवसुत, साने गुरुजी, पद्मश्री दादा ईदाते आदी महान मंडळींचा हा निसर्गसंपन्न प्रदेश. ऋतुमानानुसार आपल्या छटांनी प्रसन्न करणाऱ्या या कोकणभूमीचा विचार पूर्वीच्या काळी म्हणावा तितका झालाच नाही. “आंबा, फणस, नारळ, सुपारी, कोकम अशी एक न अनेक पिके घेणारा इथला शेतकरी जगतो हेच मोठे आश्चर्य आहे.” असे लोकांमध्ये बोलले जाऊ लागले. पायाभूत सुविधांचा पुरवठा अत्यल्प असला तरी जिद्दीने मार्ग काढणारा कोकणी माणूस सामाजिक दृष्टीकोनातून आपल्या अस्तित्त्वासाठी सातत्याने झगडत राहिला आणि आलेल्या अनुभवातून त्याने “शहाणपण विकत घेतले.”

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांची भौगोलिक परिस्थिती आणि हवामान हे शेतीसाठी कधी अनुकूल तर कधी प्रतिकूल असते. निसर्गाचा हा खेळ अनेकांना शेतीबाबत उदासीन करण्यासाठी पुरेसा ठरला. अशात जुन्या काळात जमिनीचे एकीकरण करताना अधिकारी वर्गाने केलेली घिसाडघाई आज डोकेदुखीचा विषय बनली आहे. ‘कालाय तस्मै नमः’ असे म्हटले तरीही रत्नागिरीतील जुनी पिढी आता विचार करू लागली आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून नव्या पिढीची गावच्या विकासाप्रती असलेली तळमळ समोर येऊ लागली आहे. गेलेले दिवस पुन्हा येणार नसले तरीही येणाऱ्या दिवसांचे चीज करण्यासाठी जुन्या आणि नव्या पिढीला एका निर्णयावर यावे लागणार असल्याची जाणीव निर्माण होत आहे.

राजकीयदृष्ट्या या सगळ्या सामाजिक बदलांकडे बघताना काही तथ्ये मला उमगली. येथील नागरिकांची प्रकृती अत्यंत सौम्य असल्याने ‘एखाद्या गोष्टीबाबत एखाद्याला धारेवर धरणे’ येथील लोकांना मान्य नाही. व्यक्त होण्याबाबत असणारे शिष्टाचार कोकणच्या मुशीत जन्मणाऱ्या प्रत्येकावर समाजातूनच होतात. त्यात रत्नागिरीचे चरित्र सांगण्यासाठी अथांग समुद्राच्या पाण्यासारखे दुसरे उदाहरण नाही. पाणी हळूहळू तापते आणि हळूहळू थंड होते. तसेच रत्नागिरीतील सर्वसामान्यांचे आहे; ते चटकन कोणावर विश्वास ठेवत नाहीत. आवश्यक वेळ घेतात, चाचपून बघतात आणि त्यानंतर विश्वास ठेवतात. विश्वासही इतका गाढ की, समोरून अपेक्षापूर्ती झाली नाही तरी आपला शब्द मात्र मोडू देत नाहीत.

रत्नागिरीमध्ये सर्व काही आहे. अगदी मुबलक प्रमाणात म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. फक्त अडचण आहे ती एका नव्या दृष्टीची (vision). २५ वर्षांहून अधिक काळ भारतीय जनता पार्टीच्या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारे विद्यमान प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे हीच नवी दृष्टी घेऊन रत्ननगरीत येत आहेत. विधानसभा आमदार, उर्जामंत्री आणि आता विधान परिषदेचे आमदार म्हणून त्यांनी आपल्या दायीत्वाचे निर्वहन करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये निर्भेळ यश प्राप्त करण्याचा चंग बांधला असून स्वतः आघाडीवर राहून कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आहेत. विजीगिषु वृत्ती आणि नवचैतन्याची उधळण करत आहेत. रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा ‘पंचायत से पार्लमेंट तक भाजपा’ असायला हवी हा त्यांचा आग्रह तर आपली जिद्द आहे. त्यामुळे मा. मोदीजी, मा. अमित शहा साहेब, मा. नड्डा साहेब या त्रयींचा आशीर्वाद घेऊन राज्यव्यापी अभियान करणाऱ्या मा. बावनकुळे साहेबांना राज्यात आपले नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब समर्थ साथ देत आहेत.

मा. मोदीजींच्या कल्याणकारी योजना, मा. देवेंद्रजींची व्यापक धोरणे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी रत्नागिरी भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता झटत आहे. नोकरी-व्यवसाय बाजूला सारून लोकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी यथाशक्ती योगदान देत आहे. सोशल मिडिया, प्रिंट मिडियामध्ये भारतीय जनता पार्टी ट्रेंडिंगला असून लोकांमध्ये वास्तवाचे भान निर्माण होत आहे. स्वतः जिल्हाध्यक्ष रत्नागिरीतील समस्या दूर करण्यासाठी आक्रमकपणे अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी करत आहेत. बूथ स्तरावर प्रखर राष्ट्रीय विचारसरणीच्या लोकांचे एकत्रीकरण भारतीय जनता पार्टीच्या बॅनरखाली होत आहे. ‘अंत्योदय’ आणि ‘शाश्वत विकास’ या मुल्यांचा जागर करत पदाधिकारी व नेते मंडळी कार्यकर्त्यांच्या मनात चैतन्य निर्माण करत आहेत. एकंदर संघटनेच्या दृष्टीकोनातून आता सकारात्मक वातावरण तयार होण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. रत्नागिरीचा शाश्वत विकास, समृद्ध कोकण, महाराष्ट्राची अस्मिता आणि वैभवशाली भारत या प्रेरणांनी कार्यकर्ता पेटून उठला आहे.

रत्नागिरीला लाभलेल्या निसर्गदत्त समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी आवश्यक असलेल्या सुधारणा करणे, ऐतिहासिक वारशांचे जतन करणे आणि पर्यटकांना अस्सल कोकणच्या स्वादाचा अनुभव देणे अशा अनेक गोष्टी आकर्षित करतील. गणपतीपुळे, पावस, धामणसे आदी तीर्थक्षेत्रे नियोजनबद्ध रीतीने विकसित होतानाच त्यांचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी अनेक नव्या संकल्पना राबवता येतील. या गोष्टींचे स्वरूप दिसायला जरी मर्यादित वाटले तरीही त्यातून मिळणारे लाभ, रोजगाराच्या संधी स्थानिकांना मानसिक आणि आर्थिक समाधान देतील.

मा. मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना कच्छचा केलेला कायापालट अभ्यास विषय बनला. तर जलयुक्त शिवार योजना महाराष्ट्रातील कित्येक शेतकऱ्यांचा आधार बनली. याच धर्तीवर राज्याचे माजी उर्जामंत्री, विधान परिषद सदस्य, भाजपा प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन करून ‘लोडशेडिंग’ विषय कालबाह्य केला होता. अशी अनेक कामे, जी लोकोत्तर आहेत ती भाजपा सरकारच्या काळात, भाजपा आमदार अथवा खासदारांच्या योगदानाने झाली आहेत. अशी कामे आपल्या हातून व्हावीत ही अपेक्षा सर्वपक्षीय नेत्यांची असणे स्वाभाविक आहे; मात्र त्यासाठी आपली नाळ सर्वसामान्य जनतेशी जोडली असणे गरजेचे आहे.

भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता निस्वार्थ भावाने जनसेवा करतो याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याला असणारा इतिहासाचा प्रचंड अभिमान. आम्ही नुकत्याच एका प्रवासादरम्यान रत्नागिरी विधानसभेतील एका मोहल्ल्यात मुस्लीम बांधवांची भेट घेतली त्यावेळी तेथील मौलाना ज्या पद्धतीने हिंदू आणि मुस्लिमांच्या धार्मिक मान्यतेबाबत एकेक गोष्टी उलगडून सांगत होते त्याचे अप्रूप वाटले. हिंदू धर्मात ‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति’ म्हणून एकेश्वरवादाचा पुरस्कार केला जातो तसाच मुस्लिम धर्मात फक्त ‘अल्लाह’ला मानले जाते. पद्धती वेगळ्या असल्या तरीही अंतिम सत्य एकाच आहे. यापेक्षा आमचा डी.एन.ए. एक असल्याचा पुरावा कोणता द्यावा?

लवकरच मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होणार आहे. जेवढे काम पूर्ण झाले आहे त्याबाबतचे समाधान आम्ही गणेशोत्सवात चाकरमान्यांशी गप्पागोष्टी करताना अनुभवले आहे. मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कष्टाचे फलित म्हणजे ‘चाकरमान्यांचे समाधान’ एवढेच म्हणेन. पुढील वर्षी रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण झालेले पहायला मिळेल. गावोगावी विविध विकासकामांचा धडाका सुरु आहे. जे काम मागील काही वर्षे लोकांना अभिप्रेत होते तेच काम आता रत्नागिरीत अग्रक्रमाने होत असल्याबद्दल लोकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होत आहेत.

कोकणातील शेती पावसावर अवलंबून आहे हे खरे असले तरीही शेतकऱ्याच्या घामाचे चीज करून देणारी ही माती आहे. ‘भरड धान्य’ म्हणून आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना खाऊ घातलेल्या पदार्थांमध्ये बरेचसे पदार्थ कोकणातीलच होते. त्यामुळे कोकणी चव आता विदेशातील लोकांनीही चाखली आहे. आर्थिकदृष्ट्या सुबत्ता प्राप्त होण्यासाठी मेहनत करण्याशिवाय पर्याय नाही हे समजून घेतले तर कोकण संपन्न होईल. जगाला आंब्याची चव देणारे आम्ही, जगाला चांगल्या दर्जाची काजू पुरवणारे आम्ही, कोकम, फणस, नारळ, सुपारी अशा अनेकविध उत्पादनांमधून जागतिक नावलौकिक प्राप्त करणारे आम्ही सहकाराकडे अपेक्षेपेक्षा कमी लक्ष दिल्याने मागे आहोत ही गोष्ट वास्तव आहे. पण २०२४ नंतर ‘सहकार्यम् यशोधनम्’ म्हणत लौकिक निश्चितपणे उंचावू. याशिवाय अजूनही विविध क्षेत्रांमध्ये रत्नागिरीकरांना भरारी मारायची आहे. त्यांच्या पंखांमध्ये बळ आहे मात्र मुक्त विहार करण्यासाठी रत्नागिरीमध्ये हवे तसे आकाश उपलब्ध नाही निव्वळ एवढ्या एका कारणामुळे अनेकांनी स्थलांतर केले आहे. कोकणी माणूस जोपर्यंत स्वतःच्याच आकाशात मुक्तपणे संचार करणार नाही तोपर्यंत जागतिकीकरणाच्या गतिमान अवस्थेत मागे राहील.

याचसाठी कोकणात भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि आमदार असणे दिवसेंदिवस आवश्यक होत चालले आहे. व्हिजन डोळ्यांसमोर ठेऊन मिशन मोडवर काम करण्याचे नियोजित कार्य करण्यासाठी भाजपाचे लोकप्रतिनिधी वचनबद्ध आहेत. एक सच्चा निष्ठावंत कार्यकर्ता, कष्टाळू पदाधिकारी आणि कार्यकर्ताप्रिय नेता नवी उमेद घेऊन राज्यव्यापी दौरा करतो त्यावेळी त्याचा अपेक्षित परिणाम समोर येतोच. मिळालेली जबाबदारी झोकून देऊन यशस्वी कशी करावी याचे मूर्तीमंत उदाहरण असलेले बावनकुळे साहेब रत्नागिरीमध्ये येत आहेत. त्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यासाठी आपण सर्वजण आतुर आहोत. मा. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचे नेतृत्त्व आणि मा. मोदीजी तथा मा. देवेंद्रजींचे मार्गदर्शन या शिदोरीच्या सहाय्याने रत्नागिरीमधील चळवळीला लोकांचे अधिष्ठान प्राप्त होणार आहे या विश्वासाने आम्ही सर्वजण कार्य करत आहोत.

रत्नागिरीच्या सर्वांगीण, समावेशक, शाश्वत विकासाचे लक्ष्य घेऊन चाललेल्या भाजपा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याचे माजी मंत्री व महाराष्ट्र भाजपाचे कर्तव्यदक्ष प्रदेशाध्यक्ष सन्माननीय आमदार श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब रत्नभूमीत येत आहेत. संपूर्ण रत्नागिरी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. रत्नागिरीतील तमाम भाजपा कार्यकर्ते बंधू-भगिनींच्यावतीने ‘महाविजय २०२४’चा संकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन देतो. यासाठी बावनकुळे साहेब, रत्ननगरीत, स्वागतम… शुभ स्वागतम…

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page