मुंबई- राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. शंभूराज देसाई यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे.
शंभूराज देसाई यांनी म्हटले की, ‘माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही’. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, ही विनंती आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने करतो, असेही त्यांनी म्हटले.
राज्यात ऑक्टोबर 2022 नंतर पहिल्यांदाच 2 हजाराहून अधिक अॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 450 नवे रूग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. रविवारी मुंबईत 123 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झालेली आहे. मुंबईत कोरोनाचे 43 रूग्ण हॉस्पीटलमध्ये दाखल आहेत. त्यापैकी 21 रूग्ण हे ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. राज्यातील कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करण्याचे आवाहन वेळावेळी करण्यात आले आहे.