कोत्रेवाडी डंपिंग ग्राउंडला विरोध कायम, ठाकरे शिवसेनेचे ८ जुलैला उपोषण …

Spread the love

कोत्रेवाडी डंपिंग ग्राउंड विरोधात ठाकरे शिवसेना आक्रमक..

लांजा : लांजा नगरपंचायतीतर्फे नियमबाह्य पद्धतीने कोत्रेवाडी येथील लोकवस्तीजवळ राबवण्यात येणाऱ्या डंपिंग ग्राउंड प्रकल्पाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत ८ जुलैला लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि नगरपंचायत यांना निवेदन दिले.
     

लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कोत्रेवाडी येथे लोकवस्तीजवळ घनकचरा प्रकल्प राबवला जात आहे. त्यासाठी सर्व नियमांची पायमल्ली करत जबरदस्तीने हा प्रकल्प लादला जाऊन लोकवस्तीचे जनजीवन उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला गेला आहे. यापूर्वी कोत्रेवाडी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, लांजा तहसीलदार, लांजा नगरपंचायत यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करून ग्रामस्थांनी दाद मागितली होती. एवढे असूनही शासनाचे डोळे उघडावे म्हणून वेळोवेळी उपोषण, आंदोलनंही केली; परंतु या गोष्टींकडे दुर्लक्ष करून लांजा नगरपंचायतीने घनकचरा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जागेचा मोबदला जमीनमालकांना देऊन एकप्रकारे ग्रामस्थांच्या मागणीचा अपमान केला आहे. घनकचरा प्रकल्पासाठी घेण्यात आलेली जागा ही पूर्णतः नियमबाह्य असून, येथील ग्रामस्थांचे जनजीवन उद्ध्वस्त करणारी आहे. याविरोधात  लांजा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आंदोलन  हाती घेतले आहे. त्यासाठीच ८ जुलैला लांजा तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
      

नियमबाह्य पद्धतीने कोत्रेवाडी येथे होत असलेला घनकचरा प्रकल्प तातडीने रद्द करावा अन्यथा लांजा तालुका शिवसेनेच्यावतीने यापुढे जोरदार आंदोलन केले जाईल. याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही या वेळी केली. लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांना निवेदन सादर करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, उपतालुकाप्रमुख युवराज हांदे, विभागप्रमुख भांबेड मंगेश जाधव, विभाग संघटक देवधे पंढरी गुरव, उपविभागप्रमुख गवाणे राजेंद्र सुर्वे, साटवली जितेंद्र कदम, उपविभाग संघटक वाकेड धर्मेंद्र पालये, कोत्रेवाडी ग्रामस्थ मंगेश आंबेकर, सतीश पेडणेकर आदी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page