खेड : गेला काही काळ उत्पन्नासाठी झगडणाऱ्या आणि सतत तोटा होणाऱ्या एस.टी.ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेडमधील सभेमुळे थोडा हातभार लागला आहे.मुख्यमंत्र्यांच्या या सभेसाठी जिल्ह्याच्या पाच आगारांतून १०८ बसेसचे आरक्षण करण्यात आले होते. या बसेसमुळे सभेला गर्दी झाली आणि एस.टी.ला तब्बल १४ लाख ५० हजारांचे उत्पन्न मिळाले. सभेला प्राधान्याने खेड, दापोली आणि मंडणगड या तीन तालुक्यांतील म्हणजेच आमदार योगेश कदम यांच्या मतदारसंघातील जास्तीत जास्त लोक यावेत, असे नियोजन करण्यात आले होते. त्यांच्यासह अन्य तालुक्यातील शिवसैनिकही सभेसाठी उपस्थित राहणार असल्याने या लोकांची ने आण करण्यासाठी एस. टी. बसेसचे आरक्षण करण्यात आले होते. त्यासाठी रविवारी पाच आगारांतून १०८ गाड्या सभेसाठी सोडण्यात आल्या. त्यामुळे रत्नागिरी विभागाला साडेचाैदा लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
खासगी गाड्यांसह एसटीच्या गाड्यांचा आधार घेण्यात आल्याने एस.टी.लाही थोडा दिलासा मिळाला आहे. त्यासाठी दापोली, खेड, चिपळूण, रत्नागिरी, देवरुख आगारातून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. सभेसाठी वेळेवर सोडणे व सभा संंपल्यानंतर पुन्हा आणून सोडण्याची जबाबदारी होती. प्रत्येक आगारातून माणसांच्या संख्येनुसार गाड्यांचे आरक्षण करण्यात आले होते. दापोली आगारातून ३१, खेड २५, चिपळूण २७, रत्नागिरी ९ व देवरुख आगारातून सहा बसेस सोडण्यात आल्या होत्या. एकूण १०८ एस.टी. बसेसमुळे रत्नागिरी विभागाला साडेचाैदा लाख रुपये मिळाले आहेत.