ठाणे, दि. १७ – १६ वर्षांखालील मीरा भाईंदर चॅलेंजर लीग क्रिकेट चषक श्री माँ विद्यालयाने ब्रॉवो क्रिकेट अकादमीचा पराभव करत पटकावला. ६१ चेंडूत ९२ धावांची खेळी करणारा श्री माँ विद्यालयाचा रुजुल रांजणे सामनावीरचा मानकरी ठरला.
मीरा भाईंदर येथील क्रिडांगणात मीरा भाईंदर चॅलेंजर लीग क्रिकेट चषक स्पर्धेचा अंतिम सामना श्री माँ विद्यालय आणि ब्रॉवो क्रिकेट अकादमी यांच्यात खेळला गेला. नाणेफेक जिंकत ब्रॉवो क्रिकेट अकादमीने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. श्री माँ विद्यालयाचे सलामीवीर रुजूल रांजणे आणि पार्थ देशमुख यांनी पहिल्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी केली. रुजूल रांजणे याने ६१ चेंडूत ३ षटकार आणि १० चौकार मारत ९२ धावांची खेळी केली. तर पार्थ देशमुख याने ५५ चेंडूत नाबाद ६१ धावांची खेळी केली. श्री माँ विद्यालयाने २० षटकात २ गडी बाद १८० धावा केल्या.
ब्रॉवो क्रिकेट अकादमीने लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर पंकज सिंग आणि गणेश यांनी ५६ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र मध्यमगती वेगवान गोलंदाज अथर्व सुर्वे याने आपल्या दोन षटकात दोन गडी बाद करत ब्रॉवो क्रिकेट अकादमीला सुरुवातीलाच धक्के दिले. त्यांनतर रुद्र चाटभर आणि ऋग्वेद जाधव यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले तर ३ फलंदाज धावचीत झाले. ब्रॉवो क्रिकेट अकादमी संघाने २० षटकात ९ गडी बाद १५५ धावा केल्या. श्री माँ विद्यालयाने हा सामना २७ धावांनी जिंकत मीरा भाईंदर चॅलेंजर लीग क्रिकेट चषकावर आपले नाव कोरले.