महिला आशिया चषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंका आमनेसामने होते. या सामन्यात श्रीलंका महिला संघानं आठ गडी राखून भारताचा पराभव केला.
*दांबुला :* महिला आशिया चषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंका आमनेसामने होते. हा सामना श्रीलंकेतील रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेनं आठ गडी राखून विजय मिळवत प्रथमच आशिया चषकावर आपलं नाव कोरलं.
*आठ गडी राखून विजय-*
या सामन्यात भारतीय महिला संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 166 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघानं अवघ्या 18.4 षटकांत 2 गडी गमावून सामना जिंकत विजेतेपद पटकावलं. हर्षिता समरविक्रमानं श्रीलंकेकडून सर्वाधिक नाबाद 69 धावांची खेळी केली. तर कर्णधार चमीरा अटापट्टूनं 61 धावा केल्या. कविशा दिलहरीनंही 16 चेंडूत 30 धावा करत नाबाद राहिली. भारताचा एकही गोलंदाज आपली छाप सोडू शकला नाही. केवळ दीप्ती शर्माला एक विकेट घेता आली.
*स्मृतीचं शानदार अर्धशतक-*
तत्पुर्वी भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावून 165 धावा केल्या. संघाकडून सलामीवीर स्मृती मानधनानं 47 चेंडूत 60 धावांची खेळी केली. तिच्याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज ऋचा घोषनं 30 आणि जेमिमाह रॉड्रिग्जनंही 29 धावा केल्या. श्रीलंकेकडून गोलंदाजीत कविशानं सर्वाधिक 2 बळी घेतले.
*सातवेळा भारत आशिया चषकाचा विजेता-*
महिला आशिया चषक स्पर्धेतील भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे. आत्तापर्यंत, महिला आशिया चषक (2024 सह) चे 9 हंगाम झाले आहेत, ज्यापैकी भारतीय संघ 7 वेळा विजेता ठरला आहे. मागील 2022 च्या महिला आशिया चषकात भारतानं अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करुन ट्रॉफी जिंकली होती. मात्र यावेळी श्रीलंकेनं भारताचा पराभव करत आपल्या पराभवाचा हिशोब चुकता केला.