सावर्डे : विद्यार्थ्यांच्या संकल्पना, सुप्तगुण, जिज्ञासू वृत्ती या गुणांना वाव देण्यासाठीच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या अमूर्त कल्पना मूर्त स्वरुपात प्रकट होण्यासाठी शाळाशाळांत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करणे आवश्यक आहे. यामुळेच विद्यार्थ्यांच्या संकल्पनेला दृढीकरण मिळण्यास मदत होते. आजच्या आधुनिक युगात विद्यार्थी प्रगल्भ आहेत.त्यांना शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळाले तरच विद्यार्थी आपल्या संकल्पना मांडतात व विज्ञान प्रदर्शने आयोजित केली तरच विद्यार्थी संशोधक बनतील असे प्रतिपादन केले. याप्रसंगी इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून शिवलिंग सुपनेकर यांच्या मार्गदर्शनाने प्रक्षेपित करण्यात आलेले चांद्रयान ३ या मोहिमेचे आवर्जून त्यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे लक्ष केंद्रित करावे व त्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन केले.
राज्यविज्ञान शिक्षण समिती नागपूर, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी आणि सह्याद्रि शिक्षण संस्था सावर्डेचे गोविंदराव निकम माद्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने ५१ वे रत्नागिरी जिल्हा विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या शुभहस्ते चांद्रयान ३ अवकाशाकडे प्रक्षेपित करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार श्री. शेखर निकम, अध्यक्ष श्री. बाबासाहेब भुवड, जेष्ठ संचालक श्री. शांताराम खानविलकर, मारुतीराव घाग, सचिव श्री. महेश महाडिक, पंचायत समितीच्या माजी सभापती व सदस्या सौ. पूजाताई निकम, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, गोपाळ चौधरी, गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनाक, विस्तार अधिकारी राजअहमद देसाई, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष रविंद्र इनामदार, जिल्हा व तालुका विज्ञान मंडळाचे पदाधिकारी, तालुक्यांचे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सावर्डे परिसरातील पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत समारंभानंतर प्रास्ताविकातून गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनाक यांनी विज्ञान प्रदर्शनाचा हेतू विशद केला. जिल्हा विज्ञान मंडळाध्यक्ष रविंद्र इनामदार यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या नेटक्या आयोजनाबद्दल कौतुक केले. विद्यार्थी संशोधनप्रिय असला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टीकोन निर्मितीसाठी विज्ञान प्रदर्शने उपयुक्त असतात. त्यामुळे प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी अशा संधीचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रेरणा द्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी केले.
या प्रदर्शनामध्ये उच्च प्राथमिक गट २७ प्रतिकृती, माध्यमिक गट २७ प्रतिकृती, अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य – प्राथमिक शिक्षक १८ प्रतिकृती, अध्यापक निर्मित माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य १८ प्रतिकृती, प्रयोगशाळा सहाय्यक परिचर ९ प्रतिकृती, दिव्यांग विद्यार्थी ९ प्रतिकृती व प्रश्नमंजुषेसाठी ९ तालुक्यातील ९ गट अशा एकूण ११७ प्रतिकृती सहभागी झाल्या आहेत.या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप पवार यांनी केले व आभार प्रदर्शन महेश गंगावणे यांनी केले.
चांद्रयान 3 चे प्रक्षेपण करून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करताना शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत आमदार शेखर निकम व मान्यवर