राज्यात जपानच्या मदतीने अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प राबविले जात आहेत. जपानमधील अधिकाधिक गुंतवणूकदार राज्यात यावेत यासाठी त्यांना आवश्यक सर्व सहकार्य करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी टोकियोमध्ये केली.
मुंबई : राज्यात जपानच्या मदतीने अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प राबविले जात आहेत. जपानमधील अधिकाधिक गुंतवणूकदार राज्यात यावेत यासाठी त्यांना आवश्यक सर्व सहकार्य करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी टोकियोमध्ये केली. यावेळी त्यांनी मुंबईतील चित्रनगरीसाठी सहकार्य करण्याची विनंती सोनी कंपनीला केली.
जपानच्या दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांनी आजच्या शेवटच्या दिवशी सोनी, डेलॉईट आणि सुमिटोमो कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. सोनी समूहाला चित्रनगरीत येण्याचे तसेच आयआयटी मुंबईशी संशोधनाच्या क्षेत्रात सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली तसेच बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सुमिटोमोला मुंबई ट्रान्सहार्बर लिंकमुळे तयार होणाऱ्या तिसऱ्या मुंबईत असलेल्या संधींची माहिती दिली.
फडणवीस यांनी सोनी ग्रुप कार्पोरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिरो कॅम्बे यांची भेट घेतली. महाराष्ट्राबरोबर काम करण्याची सोनीची इच्छा असल्याचे कॅम्बे यांनी सांगितले. सोनी हा भारतातील सुद्धा विश्वसनीय ब्रँड आहे. मुंबई ही देशाची करमणूक राजधानी असून चित्रनगरीच्या विकासासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत त्यासाठी सोनीने तंत्रज्ञान सहकार्य करण्याची विनंती फडणवीस यांनी केली. त्यावर शिरो कॅम्बे यांनीही ८० च्या दशकात मुंबईत काम केल्याच्या स्मृतींना उजाळा देताना, संशोधनाच्या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करणार असून त्यात महाराष्ट्राला प्राधान्य असेल अशी ग्वाही दिली. डेलॉईट तोहमत्सु समूहाच्या ईको नागात्सु यांचीही फडणवीस यांनी भेट घेतली.