
*लंडन-* ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वल्ड टेस्ट चँम्पीयन कसोटी सामना सुरू आहे. हा कसोटी सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ जीवाचे रान करत आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २ बाद २१३ अशी भक्कम धावसंख्या उभारली आहे. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ६९ धावांची गरज आहे, तर ऑस्ट्रेलिया आठ विकेट्स हव्या आहेत. मात्र दक्षिण आफ्रिकेची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात जोरदार कमबॅक केले होते. कारण ऑस्ट्रेलियाची ७ बाद ७३ अशी दयनीय अवस्था झालेली होती. त्यावेळी मिचेल स्टार्क हा फलंदाजीला आला आणि त्याने सर्व समीकरणंच बदलून टाकली. कारण दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाला १०० धावांत ऑल आऊट करेल, असे सर्वांना वाटत होते. पण त्याचवेळी स्टार्क ऑस्ट्रेलियासाठी तारणहार ठरला. कारण स्टार्कने तब्बल १३६ चेंडूंता सामना केला. या १३६ चेंडूंत त्याने पाच चौकार लगावले आणि ५८ धावांची सर्वात महत्वाची खेळी साकारली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या संघाला २०७ धावांपर्यंत मजल मारता आली आणि दक्षिण आफ्रिकेपुढे २८२ धावांचे आव्हान विजयासाठी ठेवण्यात आले.
दक्षिण आफ्रिकेचीही आश्वासक सुरुवात झाली नाही. पण एडन मार्करमन यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सावरले. मार्करमला यावेळी कर्णधार तेंदा बवुमाची चांगली साथ मिळाली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १४३ धावांची अभेद्य भागीदारी रचली. मार्करमने यावेळी नाबाद १०२ धावा केल्या, तर बवुमाने त्याला नाबाद ६५ धावांची खेळी साकारत सुयोग्य साथ दिली.
आता हा सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकलेला दिसत असला तरी ऑस्ट्रेलिया सहजपणे हा सामना सोडणार नाही. या सामन्याचा विजेता कोण ठरणार, हे फक्त एकाच तासात ठरणार आहे. हा एक तास चौथ्या दिवसाच्या सुरुवातीचा असेल. कारण दिवसाच्या सुरुवातीचा जो पहिला तास असतो त्यावेळी वेगवान गोलंदाजांना चांगलीच मदत मिळत असते. पहिल्या तासात जर ऑस्ट्रेलियाने २-३ विकेट्स मिळवल्या तर सामना रंगतदार अवस्थेत येऊ शकतो आणि हा सामना कोण जिंकेल, ते सहजपणे सांगता येणार नाही. उद्याच्या दिवशी पहिल्या एका तासात ऑस्ट्रेलिया किती विकेट्स मिळवते आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ किती धावा करतो, यावर हा सामना कोण जिंकणार ते ठरणार आहे.