
जळगाव- भाजप नेत्या रक्षा खडसे यांची नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मंत्रीपदीवर्णी लागल्याची माहिती आहे. रक्षा खडसेंना फोन आल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी रक्षा खडसे यांना दिल्लीवरून फोन आल्याची माहिती आहे. त्यासाठी रक्षा खडसे यान कुटुंबासह दिल्लीला पोहोचणार आहेत. मात्र त्यापूर्वी रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांचे डोळे पाणावले. त्यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना भाजपवर ठेवलेल्या निष्ठेचे फळ रक्षाला मिळाले असे नाथाभाऊ म्हणाले. यावेळी ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
मतदारांमुळेच दिल्लीपर्यंत जाण्याची संधी मिळाली…
यावेळी बोलतांना एकनाथ खडसे म्हणाले, ”रक्षा खडसे केंद्रीय मंत्री होत असल्याचा मनस्वी आनंद आमच्या कुटुंबाला आणि गावकऱ्यांना आहे. मला वाटते की गेले अनेक वर्षे भाजपात काम करत असताना त्या कामाचे श्रेय आणि रक्षा खडसेंनी भाजपवर ठेवलेल्या निष्ठेचे फळ म्हणून रक्षा यांना आज शपथविधीसाठी बोलावण्यात आले आहे. साऱ्यांचेच आशीर्वाद आमच्या परिवाराच्या पाठीशी आहेत. खासकरून तिसऱ्यांदा तिला संधी दिली, याबद्दल मतदारांचे आभार. मतदारांमुळेच दिल्लीपर्यंत आणि मंत्रिपदापर्यंत जाण्याची संधी मिळीली”, एकनाथ खडसे यांनी व्यक्त केल्या आहेत.
मी ही दिल्लीला जाणार…
पुढे एकनाथ खडसे म्हणाले, ”मीही दिल्लीला जाणार आहे. दुपारी ३ वाजता मी दिल्लीला जाण्यासाठी निघेन” असे म्हणत एकनाथ खडसे यांनी दिल्लीला जाणार असल्याचे म्हंटले आहे. दरम्यान, मला अश्रू आवरता आले नाहीत. इतका आनंद माझ्या जीवनात कधीही झाला नव्हता. केंद्रात मंत्रीपदाची शपथ घेणं ही आयुष्यातील सर्वांत मोठी गोष्ट आहे”, असेही ते म्हणाले.
दरम्यान नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून रविवारी तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. यावेळी भाजपला अपेक्षित यश मिळाले नसले तरी एनडीएमधल्या घटकपक्षांमुळे भाजप पुन्हा सत्तेवर बसणार आहे. या सोहळ्याची दिल्लीमध्ये जय्यत तयारी सुरु आहे. नव्या मंत्र्यांना रविवारी सकाळी पंतप्रधान कार्यालयातून फोन जाणार आहे. त्यांना पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा हे आपल्या निवासस्थानी बोलविणार असून, तेथे त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.