माजी खासदार निलेश राणेंनी व्यक्त केला वेगळाच संशय…

जनशक्तीचा दबाव न्यूज | मे ०४, २०२३.
कोकणातील बारसू प्रकल्पावरून राजकीय पारा चढलेलाच आहे. आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 6 मे रोजी बारसू येथे येणार आहेत. या दौऱ्याच्या अनुषंगाने भाजप नेते निलेश राणे यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. राणे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरे 6 तारखेला बारसूच्या दौऱ्यावर येत आहेत. ते येथे येऊन काय करणार हे मला माहिती नाही. पण मागच्या दरवाजाने वेगवेगळ्या तयाऱ्या सुरू आहेत. बाहेरची लोकं ज्यांचा येथील जमिनीशी काही संबंध नाही. कोकणाशी काही संबंध नाही. रत्नागिरीशीही काही संबंध नाही. अशी लोकं मटेरियल आत आणण्याचे काम करत आहेत.
त्यातील एक मटेरियल माझ्या कानावर आले ते म्हणजे जिलेटीनच्या कांड्या. जिलेटीन स्टीक्स कशासाठी वापरतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. हे मी खात्रीलायक सांगत आहे. मी या प्रकाराची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहे. तसेच बाकी जिल्ह्यांच्या पोलीस प्रशासनालाही माहिती देणार असल्याचे राणे म्हणाले.
हे जे कोण लोक आहेत ते स्थानिक नाहीत. ज्यांना सहा तारखेला काहीतरी घडवायचं आहे. काय घडवायचं आहे हे मला माहिती नाही. पण ही लोक आंदोलनाच्या ठिकाणी मटेरियल कसे पोहोचवावे म्हणजे काहीतरी घडेल या प्लानिंगमध्ये असल्याचा आरोप राणे यांनी यावेळी केला.
दरम्यान, बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीला विरोध वाढत चालला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत या प्रकल्पावरून सरकारला धारेवर धरण्यात आले. आंदोलकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी या सभेत केला होता.
त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत एका सौदी अरेबियाच्या म्हणजेच इस्लामिक राष्ट्राच्या प्रिन्सचा तो कारखाना आहे. त्याची गुंतवणूक तिकडे होत आहे. त्यातून काही लोकांना दलाली मिळणार आहे. किक बॅक मिळणार आहे. जे या रिफायनरीचे समर्थन करत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात खोके गेले आहेत, असा गंभीर आरोप केला होता.
परप्रांतीय जमीनदारांचे जमिनीचे भाव खाली जाऊ नये म्हणून तुम्ही आमच्या स्थानिकांवर अन्याय करत आहात, सगळे स्थानिक आहेत. कोकणातील शेतकऱ्यांच्या जमिनी तुम्ही गिळत असाल तर आम्ही विरोध करणारच, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.