भाजपमध्ये मोठं काहीतरी घडतंय, अमित शाह मुंबईत, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना हुंकार, रात्री खलबतंही होणार..

Spread the love

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये घडणाऱ्या घडामोडी काहीतरी सूचवू पाहत आहेत. या घटना आगामी विधानसभेसाठी विरोधकांचा सामना करण्यासाठी भाजप मोठी रणनीती आखत असल्याची चिन्हं आहेत. अमित शाह हे भाजपचे राजकीय ‘चाणक्य’ मानले जातात. हेच चाणक्य आता वारंवार महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. ते आतादेखील दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी ही विधानसभेची लढाई लोकसभेपेक्षा जास्त कठीण असण्याची शक्यता आहे.

मुंबई /प्रतिनिधी- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्ष चांगलाच कामाला लागला आहे. भाजपचे महाराष्ट्रातील नेते विधानसभा निवडणुकीची तयारी करत असतानाच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील महाराष्ट्राकडे विशेष लक्ष देत आहेत. महाराष्ट्र म्हणजे भाजपसाठी सारं काही आहे, अशाप्रकारचं लक्ष अमित शाह यांच्याकडून राज्याच्या विधानसभा निवडणुकीकडे दिलं जात आहे. महाराष्ट्र खास असण्यामागे अनेक कारणंदेखील आहेत. कारण महाराष्ट्राच्या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीसारखा पराभव पदरात पडला तर ते भाजपला परवडणारं नाही. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी अमित शाह स्वत: भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत आहेत. अमित शाह सातत्याने महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.

अमित शाह आज मुंबई, ठाणे इथल्या भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे अमित शाह यांच्या उपस्थितीत आज रात्री सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार आहे. अमित शाह हे गेल्या दोन आवड्यात दुसऱ्यांदा राज्यात आले आहेत. याआधी ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आले होते. त्यानंतर काही दिवसांनी ते नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकच्या दौऱ्यासाठी आले होते. यानंतर लगेच काही दिवसांनी ते पुन्हा मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा यावेळी दोन दिवसांचा दौरा असल्याची माहिती मिळत आहे.

अमित शाह संघ शाखेलाही भेट देणार..

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या आजच्या दौऱ्याला विशेष महत्त्त्व आहे. अमित शाह महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. शाह हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर असून यावेळी ते कोपरखैरणेतील संघ शाखेलाही भेट देणार आहेत. संघ प्रचारकांसोबत शाह 1 तास चर्चा करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि संघ यांच्यातील समन्वयासाठी विधानसभा संयोजक नेमले गेले आहेत. त्यामुळे अमित शाह यांच्या या दौऱ्यात ते संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा करणार आहेत.

फडणवीस यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र..

दरम्यान, अमित शाह यांच्या उपस्थितीत आज दादरमध्ये भाजपचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कार्यकर्त्यांना सूचना केल्या. “अति विश्वास ठेवू नका आणि गाफील राहू नका, असा कानमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी दिला. “आपले विरोधक एकत्रित आले आहेत. ते कुठलीही तडजोड करायला तयार आहेत. सरकारने केलेल्या कामांमुळे लोक आपल्यासोबत आहेत. ३ कोटींहून अधिक लाभार्थी सरकारचे आहेत. त्यांची मते मिळाली तरी सरकार पुन्हा येईल”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. “उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपलेला आहे. मराठी आणि हिंदू मते सोबत नसल्याने त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचत आहेत. आपलेच सरकार येईल, अशी परिस्थिती सध्या आहे. पण अती आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका”, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page