
*पडघा (Padgha) येथील बोरीवली (Borivali) गावात दहशतवादविरोधी पथकाने टाकलेल्या छाप्यात काही महत्वाची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. ही तरुण तुर्कीत (Turkey) जावून आल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे….*
*मुंबई :* पडघा (Padgha) येथील बोरीवली (Borivali) गावात दहशतवादविरोधी पथकाने टाकलेल्या छाप्यात काही महत्वाची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. बोरीवली गावातील काही तरुण तुर्की (Turkey) येथे जावून आल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. कारण तपास यंत्रणांना तुर्कीशी संबधित काही कागदपत्र मिळाली आहेत. त्यामुळं संशयित व्यक्तींची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जाणार आहे. मागील काही वर्षात कोण कुठे गेले होते? काय कारणं होती? याचा तपास केला जाणार आहे.
यातील काही संशयितांनी तुर्की येथे जावून ISIS या दहशतवादी संघटनेच्या काही प्रमुखांची भेट घेतल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. कट्टर दहशतवादी संघटनांच्या संपर्कात बोरीवलीतील काही तरुण असल्याचा तपास यंत्रणांना संशय आला आहे. त्यामुळं सध्या पोलिस कसून तपास करत आहेत.
*साकिब नाचनच्या घरावरही छापे….*
दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATS) म्हणजेच महाराष्ट्र एटीएसने ठाण्यातील पडघा येथे काल छापा टाकला होता. एटीएस पथकाने साकिब नाचनच्या घरावरही छापे टाकत आहे. दरम्यान बंदी घालण्यात आलेल्या स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेचा पदाधिकारी असलेल्या साकिबला यापूर्वी 2 दहशतवादी प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. यामध्ये 2002- 2003 मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन विलेपार्ले आणि मुलुंड बॉम्बस्फोटांचा समावेश आहे. या दहशतवादी घटनांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तर 2017 मध्ये शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा कट्टरपंथी कारवायांमध्ये सामील झाला, असा आरोप त्याच्यावर आहे.
शेकडो पोलीस बंदोबस्त घेऊन बोरवली गावातील अनेक घरांमध्ये सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. बोरवली गावातील 21 ठिकाणी ATS ने छापेमारी करत चौकशी केली होती. घरातील झडती घेण्यात आली शिवाय अनेक जणांचे मोबाईल चेक करण्यात आले होते. मोबाईल सिज करण्यात आले आहे. साकिब नाचन यांच्या घरी देखील सर्च ऑपरेशन राबवण्यात आले तसेच साकिब यांच्या नातेवाईकांची देखील चौकशी करण्यात आली. या कारवाईदरम्यान अनेक जणांचे मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत तर दुसरीकडे अनेकांच्या घरात झडती घेत असताना त्यांच्याकडून मोबाईल हँडसेट, तलवार ,सुरा, मालमत्तेबाबत संशयास्पद कागदपत्रे, दहशतवाद यास उत्तेजन देणारे आक्षेपहार्य कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. 10 तास चाललेल्या या कारवाईदरम्यान सर्च ऑपरेशन मोठ्या प्रमाणात बोरवली गावात राबवण्यात आला होता.
यादरम्यान एटीएसने संसयास्पद वस्तू जप्त केल्या असून अजूनपर्यंत कोणाला अटक किंवा ताब्यात घेण्यात आलेले नाही. एटीएसने अनेकांकडून चौकशी केली आहे मात्र कायदेशीर प्रक्रिया व चौकशी पूर्ण केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे. शिवाय एटीएस ने जप्त केलेल्या कागद पत्रात संसयास्पद आढळल्यास त्यांना चौकशीसाठी बोलावू शकते. तर कायदेशीर प्रक्रिया व चौकशी पूर्ण झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली आहे.