मुंबई : “काहींना माईक हातात आल्यावर काय बोलावं? तेच कळत नाही. कोण फडतूस म्हणतं, तर कोण काडतूस म्हणतं. कुणी काहीही म्हणतं. अरे आपल्याला यशवंतराव चव्हाणांनी चांगले विचार दिले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या काळात यशवंतराव चव्हाणांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची निर्मिती केली. त्या रस्त्याने आपण जायला हवं. वसंतदादा नाईक, शरद पवार यांनी दाखवलेल्या रस्त्याने आपण जायला हवं. तो रस्ता आपल्या भल्याचा आहे. आपल्याला निश्चितपणे दिशा देणारा आहे. त्याचा विचार आपण करायला हवा. या गोष्टी सोडून राज्यात नको त्या गोष्टी सुरू आहेत.” असे अजित पवार साताऱ्यात म्हणाले.
अजित पवारांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अलीकडेच शरद पवारांनी अदाणी प्रकरणावर मतप्रदर्शन केलं होतं. हिंडेनबर्ग कंपनीच्या अहवालात अदाणींना लक्ष्य केल्याचं दिसतं, असं विधान केलं होतं. यानंतर आता अजित पवारांनी अप्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे.