प्रत्येकाच्या जीवनात सैनिकांना अनन्यसाधारण महत्व-पालकमंत्री उदय सामंत…

Spread the love

रत्नागिरी- प्रत्येकाच्या जीवनात सैनिकांना अनन्यसाधारण महत्व आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. महसूल सप्ताहानिमित्त आज डी. जे. सामंत महाविद्यालय पाली येथे ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशभक्तीपर गीताने शहीद सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. वीरमाता, वीर पत्नी, माजी सैनिक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी कोकण विभागीय आयुक्त डाॅ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रांताधिकारी जीवन देसाई, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लक्ष्मण गवळी तसेच माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत म्हणाले कि, आपल्या जीवाची पर्वा न करता देशाच्या सीमेवर सैनिक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळेच तर आपण सुखाने झोपतो, वावरतो. आपल्या आयुष्यामध्ये सैनिकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पोलीस विभागाही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची भूमिका बजावत असतो. राज्यमंत्री असताना आपल्याकडे ११ खाती होती. त्यावेळी नगर विकास मंत्री म्हणण्यापेक्षा सैनिक कल्याण विभागाचा मंत्री म्हणण्यामध्ये आपल्याला भूषणावह वाटायचं. शासनाने दिलेले कार्यक्रम तंतोतंत करण्याचे काम महसूल विभागामार्फत केले जातात. महसूल विभाग प्रामाणिकपणे काम करून जनतेला न्याय देण्याचे काम करत असतो. रत्नागिरीमध्ये राबवण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आदर्श इतर जिल्ह्याने घेतला. विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागात महसूल विभागाचं उत्तम काम होत असल्याबाबतचे गौरव उद्गार त्यांनी यावेळी काढले.

विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर म्हणाले, आज राज्यात सर्वत्र हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महसूल विभागात काम करत असताना कर्मचाऱ्यांच्या डिक्शनरीमध्ये ना हा शब्द नसतो. महसूल सप्ताह निमित्त सात दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महसूल विभाग जोमाने काम करत आहे आणि वर्षाचे ३६५ दिवस अशा प्रकारचे काम विभाग करत असतो. शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महसूल दूत ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यामुळे शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्याचा प्रचार, प्रसार होण्यासाठी मदत होणार आहे. तसेच महसूल दूत म्हणून काम करणाऱ्यांना देखील विभागामार्फत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. येथील जनतेची दाखले तसेच इतर कामे तात्काळ होण्याच्या दृष्टीने मोबाईल नंबरची सुविधा इतर जिल्ह्यामध्ये राबविण्यात आली आहे. त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यातही राबविण्यात यावी तसेच त्या मोबाईल नंबरचा मोठ्या प्रमाणावर प्रचार, प्रसिद्धी करावी,अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह प्रस्ताविकपर भाषणात म्हणाले, सैनिक देशाची शान, सन्मान आहेत. त्यांच्यासाठी आज सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. असे सांगून जिल्ह्यात महसूल विभागामार्फत महसूल सप्ताहात केलेल्या कामाची माहिती त्यांनी दिली. तसेच या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त उपस्थित राहिल्याबाबत धन्यवाद व्यक्त केले. संजय गांधी निराधर योजना लाभार्थी, नवीन रेशनकार्ड (नवीन शिधा पत्रिका), नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित नागरिकांना अनुदान वाटत तसेच इतर योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. यावेळी महसूल विभागामार्फत जमा करण्यात आलेल्या १ लाख रुपये ध्वजदिन निधी कार्यालयाकडे सूपुर्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी आभार मानले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page