
महाड- महाड परिसरात भीमसृष्टीची निर्मिती करण्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. यासाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही देखील मंत्री शिरसाट यांनी दिली. महाड येथे समाजाला समानतेचा व समतेचा संदेश देणाऱ्या चवदार तळे सत्याग्रहाचा ९८ व्या वर्धापन दिनाच्या आयोजित कार्यक्रमात शिरसाट बोलत होते. स्थानिक आमदार व रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी चवदार तळे सुशोभीकरणासाठी यापूर्वीच घोषीत झालेल्या ७ कोटी रुपयांच्या तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाच्या तीन कोटी रुपयांची कामे तातडीने सुरू केली जातील, अशी घोषणा केली.
ऐतिहासिक महाडमध्ये आज चवदार तळे सत्याग्रहाचा 98 वा वर्धापनदिन लाखो भीम भक्त अनुयायांच्या उपस्थितीमध्ये गुरूवारी सकाळपासूनच उत्साहात सुरू झाला. सकाळी साडेआठ वाजता चवदार तळे येथील डॉ. आंबेडकर स्मारकासमोर रायगड पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळी हेलिकॉप्टर मधून चवदार तळे परिसरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय शिरसाट यांनी आपल्या विभागामार्फत भीमा कोरेगाव येथील स्मारकासाठी 100 कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती दिली. बुद्धगया येथे बिहार शासनाच्या वतीने दहा एकर जागा अधिकृत करून त्या ठिकाणी न्याय भवन बांधण्याचा मनोदय व्यक्त केला, तर राज्यात 125 ठिकाणी वसतिगृहे निर्माण करण्यात येणार असून त्यामधून 25000 विद्यार्थ्यांची सोय होईल, असा विश्वास व्यक्त केला. चवदार तळे येथील पाण्याच्या शुद्धीकरणासाठी फिल्टरेशन प्लांट लावण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले.
यावेळी भरत गोगावले यांनी सुशोभीकरणाच्या कामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात घोषणा करण्यात आलेल्या सात कोटी रुपयांच्या तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या तीन कोटी रुपयांच्या कामांची तातडीने सुरुवात होईल, असे सांगितले. दोन वर्षांनी येणाऱ्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शतकपूर्ती वर्धापन दिनासंदर्भात शासन तातडीने मंत्रिमंडळाच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये कार्यक्रमाची निश्चिती करेल असे त्यांनी जाहीर केले.
चवदार तळे सत्याग्रहाच्या 98 व्या वर्धापन दिनाला संपूर्ण देशभरातून बुधवारी सायंकाळपासूनच लाखो भीम अनुयायी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. येणाऱ्या सर्व भीम अनुयायांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. महाड शहरचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव आणि डी वाय एस पी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. 200 पोलीस व 28 अधिकारी याकरिता नियुक्त केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. चवदार तळे विचार मंचाच्यावतीनेही मागील काही वर्षांपासून या ठिकाणी विशेष उपक्रमांचे तसेच जलपान व नाश्ता भोजनाची मोफत व्यवस्था केल्याची माहिती विचार मंचाच्या वतीने देण्यात आली.