
सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. ६० फूट खोल ओहोळात कार कोसळूनही सहा युवक सुदैवाने बचावले. पोलीस अधिक तपास करत आहेत.
सिंधुदुर्ग, प्रतिनिधी : दैव बलवत्तर म्हणजे काय नशीबाचा खेळ काय असतो ते प्रत्यक्ष डोळ्यांनी या तरुणांनी अनुभवलं, अक्षरश: गाडीचं नुकसान झालं असतानाही 6 तरुणांचा जीव वाचला आहे. सिंधुदुर्गात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. त्यातच गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. बांदा बसस्थानकाजवळ असलेल्या दुसऱ्या पुलावरून भरधाव वेगात असलेली एक कार सुमारे ६० फूट खोल ओहोळातील पाण्यात कोसळून अपघात झाला.
हा भीषण अपघात बुधवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात कारमधील सहाही युवक आश्चर्यकारकरित्या बचावले आहेत. गुरुवारी सकाळी ही घटना राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी प्रशांत पांगम यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ बांदा पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांना याची माहिती दिली. माहिती मिळताच बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०७ एजी ०००४ क्रमांकाची ही कार रात्री ओहोळात कोसळली. रात्री पाण्याचा प्रचंड वेग आणि मुसळधार पाऊस सुरू असल्याने अपघात झाल्याचे लक्षात आले नाही. ही कार सावंतवाडी येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलापासून सुमारे १०० मीटर मागे ही कार डिव्हायडरवर चढली आणि प्रचंड वेगाने स्ट्रीट लाईटचा खांब तोडून थेट सुमारे ६० फूट खोल ओहोळात कोसळली. कारमध्ये सावंतवाडी येथील सहा युवक होते. या भीषण अपघातातून हे सर्व युवक सुदैवाने बचावले असून, त्यांना किरकोळ दुखापत झाली असल्याची शक्यता आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.