
चिपळूण, ता. ३ चिपळुणात सुमारे १७ लाखांचा गुटखा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस तपासात हा गुटखा गोवा येथून आणल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात चिपळुणातील सहा बडे व्यावसायिक असून, ते अजूनही पसार असल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र संबंधित व्यावसायिक पसार असले तरी त्यांच्या यंत्रणेचे नित्यनेमाने कामकाज सुरू असल्याने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कापसाळ येथे २९ मे रोजी गुटख्याच्या पोत्याने भरलेली गाडी चिपळूण पोलिसांनी पकडली होती. या कारवाईत १६ लाख ९४ हजार रुपये किमंतीचा गुटखा तर ७ लाख रुपयांची गाडी असा २३ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. तर या प्रकरणी सज्जन रामचंद्र निवेगी (३५, सावंतवाडी) या टेंपोचालकाला अटक करण्यात आली आहे. गुटखा खरेदीचे गोवा हे मुख्य केंद्र असून, त्या ठिकाणाहून आणलेला गुटखा हा इतरत्र पाठवला जातो, हे आजवरच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. कापसाळ येथे पकडण्यात आलेला गुटखा हा देखील गोव्याहून आणला गेला आहे. तो चिपळुणातील काही बड्या व्यावसायिकांना देण्यात येणार होता. टेम्पोचालक सज्जन निवेगी याच्याकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीअंती ही माहिती पुढे आली आहे.
एकत्रित व्यवसाय..
चिपळुणात गुटखा विक्री करणारे ते बडे व्यावसायिक कोण? त्याचे नाव अद्याप पुढे आले नसले तरी पोलिस त्याचा शोध घेत आहेत. गुटखा व्यवसाय वेगवेगळा केल्याने चुगली होण्याची शक्यता असते. हा धोका टाळण्यासाठी काहींनी एकत्रित येऊन हा व्यवसाय सुरू केल्याची चर्चा आहे.