
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबवून ८१ टन कचरा संकलित केला. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढली .
सिंधुदुर्ग /प्रतिनिधी- डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे पार पडली. या उपक्रमात २३७६ श्री सदस्य सहभागी झाले होते. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा प्रमुख सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करत एकूण ८१ टन कचरा संकलित केला. यामध्ये ३९,५०० चौरस मीटर परिसर, १० किलोमीटर लांबीचा दुतर्फा रस्ता आणि २ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा पूर्णतः स्वच्छ करण्यात आला. या अभियानात श्री सदस्यांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही सरकारी अधिकारी आणि कर्मचारी देखील सहभागी झाले होते.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून भारतातच नव्हे, तर परदेशातही स्वच्छता मोहिमा राबवत आहे. संस्थेच्या या व्यापक उपक्रमाचा भाग म्हणून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त २ मार्च २०२५ रोजी संपूर्ण भारतभर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ८.३० वाजल्यापासून सुरू झालेल्या या अभियानात हजारो स्वयंसेवकांनी आपापल्या भागातील स्वच्छतेसाठी योगदान दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात या अभियानांतर्गत अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये चिवला बीच, मालवण समुद्रकिनारा, कासार्डे येथील श्री महालक्ष्मी मंदिर आणि श्री विठ्ठलादेवी मंदिर परिसर, तळेरे बसस्थानक, पंचायत समिती वैभववाडी, पी.एच.सी. फोंडाघाट, एस.टी. स्टँड कणकवली, पिंगुळी तिठा रस्ता, निमूसगा ते लाइट हाऊस रस्ता, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय आणि कुणकेश्वर मंदिर परिसर व रस्ता यांचा समावेश होता. या मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचलेला प्लास्टिक कचरा, कागद, काचेच्या बाटल्या आणि अन्य घाण दूर करण्यात आली. विशेषतः समुद्रकिनाऱ्यांवरील आणि रस्त्यांच्या दुतर्फा असलेला कचरा उचलून त्या भागांना स्वच्छ आणि सुरक्षित करण्यात आले.
स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने राबविण्यात आलेली ही मोहीम भविष्यातही सातत्याने चालू राहील, असे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे केवळ स्वच्छता मोहीम राबविणे पुरेसे नाही, तर स्थानिक नागरिकांनीही स्वच्छतेची जबाबदारी घेतली पाहिजे. यासाठी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी लोकांमध्ये जनजागृती केली तसेच कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकचा वापर टाळण्याचे महत्त्व आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याबाबत मार्गदर्शनही केले. या उपक्रमामुळे स्थानिक लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढली असून, भविष्यात अधिकाधिक लोकांनी अशा मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छ भारत अभियानाला गती देण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व अधिक वाढत असून, यासंदर्भात प्रत्येकाने जबाबदारीने पुढाकार घ्यावा, असे आयोजकांनी स्पष्ट केले.