कर्नाटक सरकारच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राहणार उपस्थित
बंगळुरू- काँग्रेस नेते सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून उद्या म्हणजेच शनिवारी शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.
काँग्रेसने शपथविधी सोहळ्यात विरोधी पक्षांची ताकद दाखवण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले होते. यातच कर्नाटक सरकारच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. याबाबत पवार यांनी माहिती दिली आहे.
ते म्हणाले आहेत की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे. शरद पवार म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासंदर्भात मला काँग्रेस अध्यक्षांचा फोन आला. त्यांनी सांगितले की अनेक प्रमुख नेत्यांना आमंत्रित केले आहे आणि मला या समारंभाला उपस्थित राहण्याची विनंती केली. त्यामुळे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मी उद्या कर्नाटकात जाणार आहे. दरम्यान, आज सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. कर्नाटकातील दोन्ही नेते आता काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार कर्नाटकच्या नवीन मंत्रिमंडळात मंत्र्यांचा समावेश आणि खात्यांच्या वाटपावर चर्चा करण्यासाठी आज शुक्रवारी नवीदिल्लीत आले आहेत.