गुहागर : मार्च महिन्यातच पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शृंगारतळी बाजारपेठतील नळपाणी योजनेच्या विहिरीचे पाणी आटले आहे. त्यामुळे बाजारपेठेवर पाणी संकट ओढवले आहे. पर्याय म्हणून दिवसभरातून तीनवेळा टँकरने पाणी आणून ते विहिरीत टाकले जात आहे. हा टँकरने पाणीपुरवठा गुहागर-विजापूर रस्ता रूंदीकरणाच्या मनीषा कन्स्ट्रक्शन ठेकेदाराकडून सुरू आहे.
पाटपन्हाळे गावातील ही बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर विस्तारली आहे. येथील नागरिकांनी ४-४ माळ्यांच्या इमारतीमध्ये आपली बिर्हाडे थाटली आहेत. सुमारे दीड किलोमीटर लांबीची ही बाजारपेठ आहे. यामध्ये शेकडो भाडोत्री रहात आहेत. काही वर्षापूर्वी जलस्वराज्य योजना या गावात राबवण्यात आली होती. या योजनेची विहीर मोडकाघर धरणालगतच खोदण्यात आली होती परंतु जलस्वराज्य कमिटीच्या उदासिनतेमुळे ही योजना बंद पडली. अतिउष्म्यामुळे पाण्याची पातळी खालावलेली आहे.