अयोध्येत श्री राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तब्बल 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी (22 जानेवारी) भगवान श्री राम भव्य आणि दिव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह संत समाज आणि प्रतिष्ठित लोकांच्या उपस्थितीत राम लल्लाच्या मूर्तीचा अभिषेक करण्याचा ऐतिहासिक विधी पूर्ण झाला.
अयोध्या – लाखो रामभक्तांच्या उपस्थितीत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हजारो क्विंटल फुलांनी अयोध्या नगरी नवरीसारखी सजवण्यात आली. श्री रामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामभक्तांना संबोधित केलं. आमचे रामलल्ला तंबूत राहणार नसून, ते आता भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. आजच्या दिवसाची वाट पाहण्यासाठी तब्बल 500 वर्षाचा प्रदीर्घ काळ लागला. त्यामुळं प्रभू राम आपल्याला नक्कीच क्षमा करतील, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.
श्रीराम भव्यदिव्य मंदिरात विराजमान..
आज आमचे राम घरी आलेत. अनेक वर्षानंतर आज आपल्याला श्री रामाचं मंदिर सापडलं आहे. गुलामगिरीची मानसिकता मोडून राष्ट्र उभं राहिलं. 500 वर्षाचा हा काळ सामान्य नाही. प्रदीर्घ वियोगामुळं आलेला त्रास आता संपला आहे.राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतरही भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावरून कायदेशीर लढाई लढली गेली. अखेर श्रीराम आपल्या भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले याचा प्रचंड आनंद असल्याची भावना मोदींनी यावेळी व्यक्त केली.
श्रीराम शांती, संयमचे प्रतीक..
काही लोक ‘राम मंदिर बना तो आग लगेगी’ असं म्हणायचे, अशा लोकांना भारताच्या सामाजिक भावनेची शुद्धता समजू शकली नाही. राम लल्ला हे भारतीय समाजाच्या शांती, संयम, परस्पर सौहार्द आणि समन्वयाचे प्रतीक आहेत. राम मंदिर हे ऊर्जेला जन्म देत आहेत, अशी भावनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात व्यक्त केली.