
*संगमेश्वर : दिनेश अंब्रे –* दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संगमेश्वरच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये श्रावण धारा कार्यक्रम आयोजित केला गेला. कार्यक्रमाची सुरुवात व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव श्री. धनंजय शेट्ये सर यांनी श्रीफळ वाढवून केली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. खामकर श्री. दळवी सर,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
श्रावण महिन्यातील वेगवेगळे सण दाखवण्याचा आणि मुलांमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्य जपण्याचा यामागे प्रशालेचा हेतू असतो. या श्रावण धारा कार्यक्रमांमध्ये मंगळागौर खेळाचे विविध प्रकार इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थिनीनी सादर केले.




यामध्ये फुगडींचे विविध प्रकार अडवळ घुम पडवळ घुम, सुपली, घागर,लाट्या, होडी प्रकार, आगोटा पागोटा असे मंगळागौरीचे विविध खेळ नृत्यातून दाखवले.विद्यार्थ्यांनी या खेळातून पर्यावरणामध्ये प्लास्टिकचा वापर कमी करून कापडी पिशव्यांचा वापर करणे योग्य आहे तसेच प्लास्टिक पर्यावरणाला किती घातक आहे याचाही संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना सौ. अर्चिता कोकाटे मॅडम यांनी मंगळागौरीचे श्रावण महिन्यातील पार्वती म्हणजेच गौरीची पूजा, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व तसेच पूर्वीच्या महिलांना या कार्यक्रमाचा होणारा शारीरिक आणि मानसिक फायदा विद्यार्थ्यांना पटवून दिला.
श्रावण महिन्यातील गोकुळाष्टमी चे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा खेळ प्रशालेमध्ये दाखवला. विद्यार्थ्यांनी थराची दहीहंडी करून दहीहंडी फोडली.या सर्व कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह दिसून आला.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*