कराड : पुणे-बंगळूरू महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी मलकापूर येथील उड्डाणपूल पाडण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यात लोखंडी अडथळे (बॅरिकेटर) उभारताना ते वेल्डिंग करण्यासाठी आणलेल्या जम्बो जनरेटरला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. कोयना औद्योगिक वसाहतीसमोर ही धक्कादायक घटना घडली.
सध्या चौपदरी असलेल्या पुणे-बंगळूरू महामार्ग प्रशस्त असा सहापदरी करणाच्या कामासाठी कराडचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूरनाका येथील उड्डाणपूल पाडण्याचे काम गेल्या आठवड्यापासून सुरु आहे. या कामाबरोबरच आता या लगतचा मलकापूर येथील उड्डाणपूल पाडण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यात लोखंडी अडथळे ( बॅरिकेटर ) उभारताना हे बॅरिकेटर वेल्डिंग करण्यासाठी डंपरमधून आणलेला जनरेटर खाली उतरवत असताना त्यातून बारीक ठिणग्या उडत असल्याचे तेथील कामगारांना दिसून आले. यावर प्रसंगावधान राखत आणि धोका पत्करत पटकन हा जनरेटर डंपरमधून खाली उतरण्यात आला असता त्याने पेट घेतला. दरम्यान या जम्बो जनरेटरमधील शॉर्टसर्किटचा प्रकार गांभीर्याने घेवून नजीकच्या अग्निशमन दलाचे बंब बोलवण्यात आले होते. सुदैवाने ही यंत्रणा गतीने दाखल झाल्याने ही आग आटोक्यात आणणे शक्य झाले. आणि मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी या कालावधीत मात्र, एकच गोंधळ उडाला. उलट – सुलट चर्चा झाल्याने लोकांमध्ये खळबळही उडाली. कराडच्या प्रवेशद्वारावरील आणि लगतचा मलकापूरमधील असे हे दोन उड्डाणपूल महामार्गावरील वाहतूकव्यवस्थेचा फार मोठा बट्याबोळ न होता जमीनदोस्त करण्याचे आव्हान ठेकेदार, उपठेकेदार कंपन्यांसह संबंधित यंत्रणेला पेलावे लागणार आहे. हे दोन्ही पूल पाडून त्या जागी सलग भव्य पूल उभारण्याच्या एकूणच कामाला तब्बल दोन वर्षे लागणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी, धुळ, प्रदुषण याच्या त्रासासह अगदी पायी चालत जाण्यासही प्रचंड अडचणी असल्याने या परिसरातील लोक, वाहनधारक, प्रवासी हवालदिल झाले आहेत. हे दोन्ही पूल पाडण्याच्या पार्श्वभूमीवर वारुंजी फाटा ते डी मार्ट मॉलपर्यंत वाहतुकीत विलक्षण बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारक गोंधळून जात आहेत.
महामार्ग सहापदरिकरणाचा मुख्य ठेका आदानी उद्योग समूहाकडे असून, सहठेकेदार म्हणून डी. पी. जैन कंपनी काम करीत आहे. कराडजवळ महामार्गाचे तब्बल १४ पदर बनणार आहेत.
जाहिरात :