मुंबई :- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या शिफारशीवरून दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली झाली पण महाराष्ट्र प्रशासनिक लवादाने (मॅट) दोनच दिवसांत या बदल्यांना स्थगिती दिली आहे. मंत्री चव्हाण यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.
सार्वजनिक बांधकाम मंडळ लातूरचे अधीक्षक अभियंता सलिम शेख यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयात करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम मंडळ मुंबईचे अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी यांची बदली नगरपालिका प्रशासन मुंबई येथे याच पदावर करण्यात आली होती. ६ नोव्हेंबरला हा आदेश काढण्यात आला होता. शेख आणि बनगोसावी यांनी लगेच मॅटमध्ये धाव घेतली. बदलीच्या कायद्यानुसार तीन वर्षांच्या आत बदली करता येत नाही, असा आधार शेख आणि बनगोसावी यांनी मॅटसमोरील याचिकेत घेतला होता.
बनगोसावी आणि सलिम शेख यांची बदली मुदतीच्या आत का करण्यात आली, यावरून उलटसुलट चर्चा आहे.