“कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचा मविआला ‘दे धक्का’…”

Spread the love

भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा ऐतिहासिक विजय…

जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | फेब्रुवारी ०२, २०२३.

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा आज निकाल आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपने खाते उघडले असून भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दैदिप्यमान विजय संपादन करत इतिहास रचला आहे. त्यांनी शेकापचे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २०,६४८ मतं पडली आहेत, तर बाळाराम पाटील यांना अवघ्या ९,७६८ मतांवर समाधान मानावं लागलं आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या या दणदणीत विजयाने भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत उत्साहाचं वातावरण आहे. उद्योगमंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत तसेच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब माने यांनी या विजयाबद्दल म्हात्रे यांचं अभिनंदन करत विधान परिषदेतील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाबाबत बोलताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले “विधानपरिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे बाळासाहेबांची शिवसेना व भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे ऐतिहासिक विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! त्यांचा विजय हा शिंदे-फडणवीस सरकारवरील कोकणवासीयांनी दाखविलेला विश्वास आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!”

भाजपा नेते, माजी आमदार बाळासाहेब माने यांनी एका tweet च्या माध्यमातून नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे अभिनंदन केले आहे. या tweet मध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे यांना tag करून म्हटले आहे, “ज्ञानेश्वर म्हात्रे जी, कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत दैदीप्यमान विजय संपादन करून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाल्याबाबत आपले मनस्वी अभिनंदन. “शिक्षकांचा आमदार शिक्षक” झाल्यामुळे शिक्षण क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल याची खात्री आहे. #Dnyaneshwar_Mhatre”

दरम्यान विजयनंतर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. “हा माझा एकट्याचा विजय नाही, हा माझ्या मतदारसंघातील सर्व शिक्षकांचा विजय आहे. मी गेल्या सहा वर्षांमध्ये जे काम केलं त्याची पोचपावती मला माझ्या मतदारसंघातील शिक्षकांनी मतदानाच्या रुपात दिली. तब्बल ३३ संघटनांनी मला विश्वास दिला होता. त्याच आधारावर आज मी विधान परिषदेच्या माध्यमातून आपला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सज्ज झालो आहे. मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री आणि पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.”

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page