धाराशिव : या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. शिवराज राक्षे याने 65 वा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. शिवराज राक्षे याने मानाची गदा पटकावली आहे. या महाराष्ट्र केसरी फायनल सामन्याचं आयोजन हे धाराशीवमधील गुरुवर्य के टी पाटील क्रीडा नगरीतील तुळजाभवानी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. महाराष्ट्र केसरी फायनलमध्ये माती गटातून हर्षवर्धन सदगीर याने धडक मारली. तर गादी गटातून शिवराज राक्षे अंतिम फेरीत पोहचला होता. या दोघांमध्ये प्रतिष्ठेच्या लढतीत शिवराज राक्षे याने बाजी मारली. आता महाराष्ट्र केसरी ही मानाची गदा पटाकावल्यानंतर शिवराज राक्षे याच्यावर सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
सेमी फायनलमध्ये काय झालं?
त्याआधी माती आणि गादी गटातून महाराष्ट्र केसरी सेमी फायनल सामना पार पडला. माती गटातून गणेश जगताप आणि हर्षवर्धन सदगीर आमनेसामने होते. या सामन्यात हर्षवर्धनने गणेश जगतापचा 6-2 असा पराभव केला. तर गादी गटातून सेमी फायनलमध्ये शिवराज राक्षे याने पृथ्वीराज मोहोळ याच्यावर 10-0 अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवला.
शिवराज राक्षे याची पहिली प्रतिक्रिया
शिवराज राक्षे याने दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावल्यानंतर टीव्ही 9 मराठीला पहिली प्रतिक्रिया दिली. शिवराजने यावेळेस देवाचे आभार मानले. तसेच महाराष्ट्र केसरीबाबत शिवराजने काय प्रतिक्रिया दिली हे आपण जाणून घेऊयात. “मी आजचा विजय हा माझ्या आई वडील आणि गुरुजनांना समर्पित करतो. महाराष्ट्र केसरीच्या वादाबाबत मी बोलणार नाही. मात्र दोन्ही महाराष्ट्र केसरीचे किताब मी पटकावले आहेत. आम्ही दोघेही एकाच वस्तादाचे पैलवान आहोत त्यामुळे दोघांचे डावपेच एकमेकांना माहिती होते. मात्र ईश्वर कृपेने मी विजयी ठरलो”, अशी प्रतिक्रिया शिवराज राक्षे याने दिली.
बक्षिसांची लयलूट
दरम्यान महाराष्ट्र केसरी ठरलेल्या विजेत्या शिवराज राक्षे याला चांदीची गदा देण्यात आली आहे. तसेच स्कॉर्पिओ कारही देण्यात येणार आहे. तर उपविजेत्या मानाची चांदीची गदा, ट्रॅक्टर आणि आदी बक्षिसे देण्यात येणार आहे.