
*पुणे-* छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्याठिकाणी जन्म झाला त्या पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्मोत्सव सोहळा आज बुधवारी मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी ५ पारंपारिक पोषाखातील शिवकन्यांनी पाळणा गायला. जन्मोत्सवाच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आशिष शेलार यांनी देखील पाळणा हलवला. यावेळी शिवरायांची जन्मखोली विविध रंगाच्या फुलमाळांनी सजवण्यात आली होती.
दगडी बांधकामात असेलली शिवरायांची जन्मभूमी खूपच आकर्षक दिसत होती. या जन्मखोलीमध्ये बालशिवबा यांचा पाळणा देखील लावण्यात आला होता. या जन्मसोहळ्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या जन्मसोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातून मोठ्यासंख्येने शिवभक्त महिला, तरुण-तरुणी पारंपारिक पोषाखामध्ये उपस्थित होते. शिवजन्मोत्सव साजरा होत असताना छत्रपती शिवाजी महाराजाच्या पोषाखात चिमुकले शिवबा देखील पाहायला मिळाले. शिवजन्मोत्सव साजरा झाल्यानंतर मर्दानी खेळ, पारंपारिक नृत्य, पारंपारिक वाद्य वाजविण्यात आली. पोवाडे देखील गाण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या सैन्य दलाने सलामी देखील दिली.