धाराशिव – धाराशिव लोकसभा मतदार संघ हा गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचा मूळ मतदार संघ आहे. आम्ही निवडून आलेल्या १८ सह लढवलेल्या २३ जागेवर ठाम आहोत. यातील एकही जागा सेना सोडणार नाही. एखाद वेळेस भाजप नेते चुकून बोलले असतील, असे प्रत्युत्तर पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी भाजपाचे माजी मंत्री तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना दिले आहे.
राणाजगजितसिंह पाटील यांनी दोन दिवसांपुर्वी मोदी @9 अभियाननिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत धाराशिव लोकसभा मतदार संघातून भाजपचा खासदार निवडून आणण्यासाठी सहकार्य करा, असे म्हणत ही जागा भाजपा लढवणार असल्याचे संकेत दिले होते. आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या उपस्थित जिल्हा नियोजन समिती बैठकीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
नगरपालिकेला १५४ कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत भोगावती नदीच्या पाण्याचं प्रदूषणाला रोख लावण्यासाठी ब्लु लाईन आणि रेड लाईन याचं मार्किंग करुन घेऊन टप्प्या टप्प्यावर एसटीपी बसवून पाण्याचे शुद्धीकरण करुन पुन्हा नदीत सोडण्याच्या या प्रकल्पाचे लवकरच होणार असल्याचे सावंतांनी सांगितले.