ठाणे : पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व प्रभागातील नालेसफाईची कामे पूर्ण करावीत, सद्यस्थितीत सुरू असलेली रस्त्यांची कामे पूर्ण करणे, तसेच अनुषंगिक मान्सूनपूर्व सर्व कामे तातडीने करावीत यासाठी आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना दिवा शहर प्रमुख तथा माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यासह सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.सोबत माजी महापौर श्री नरेश म्हस्के यांची उपस्थिती होती.
सद्यस्थितीत शहरात सर्व ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. ही रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. तसेच ज्या ज्या ठिकाणी सखल भागात पाणी साचते अशा ठिकाणी आवश्यक उपाययोजना करुन पाणी साचणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्याची छाटणी करणे, धोकादायक झाडांबाबत निर्णय घेणे, सर्व प्रभागातील गटारांची साफसफाई, रस्त्यांची साफसफाई आदी सर्व कामे करण्याबाबतची मागणी सर्व सदस्यांनी केली. तसेच पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास तातडीने मदत मिळण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिकेचा आपत्कालीन विभाग सज्ज करणे, मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता ज्या भागात पाणी साचते तेथील पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपींगची व्यवस्था करणे, आवश्यकतेनुसार बोटी सज्ज ठेवणे, अतिधोकादायक इमारतींबाबत नागरिकांमध्ये जागृती करुन योग्य निर्णय घेणे आदींबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व बाबींची नोंद घेत शहरात सुरू असलेली सर्व कामे ही 31 मे पूर्वी युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येतील असे नमूद केले. तसेच नालेसफाईच्या कामांना देखील सुरूवात झाली असून सर्वच प्रभागातील नाले हे मे अखेरपर्यत पूर्ण होण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांना आदेश निर्गमित केले असल्याचे त्यांनी नमूद केले.