‘शिवजयंती’ अर्थात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव महाराष्ट्रात एखाद्या मोठ्या सणाप्रमाणे साजरा केला जातो. भारतात महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी छोट्या प्रमाणावर शिवजयंती साजरी केली जाते. मराठी पंचागाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 रोजी म्हणजे शुक्रवार 19 फेब्रुवारी 1660 ला पुण्यातील शिवनेरी किल्यावर शिवरायांचा जन्म झाला. हा दिवस म्हणजे शिवजयंती अथवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त जाणून घेऊया शिवजंयती माहिती, कधी आणि कोणामुळे या उत्सवाला सुरूवात झाली.
शिवजयंती माहिती-
महाराष्ट्रात कशी साजरी केली जाते शिवजयंती…
शासनाने निर्धारित केलेल्या नियमाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 रोजी म्हणजेच (इंग्रजी कॅलेंडरनुसार 19 फेब्रुवारी 1630) ला शिवजयंती साजरी केली जाते. मात्र आजही काहीजण तिथी नुसार म्हणजेच वैशाख शुद्ध तृतीया शके 1549 अर्थात (इंग्रजी कॅलेंडरनुसार 6 एप्रिल 1627) ला महाराजांचा जन्मोत्सव साजरा करतात. महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करण्याबाबत दोन वेगवेगळे मतप्रवाह आढळतात. शिवजयंती नेमकी कधी साजरी करावी आणि महाराजांची जन्मतारीख कशी ठरवावी यासाठी महाराष्ट्र शासनाने 1966 साली समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालानुसार आणि भविष्यात हा वाद टाळण्यासाठी शासनाने 2001 साली एकोणीस फेब्रुवारी ही तारीख शिवजयंती साजरी करण्यासाठी जाहीर केली होती. त्यानुसार आजही या दिवशी शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते. महाराष्ट्रात या दिवशी सार्वजनिक सुट्टीही असते. थोडक्यात आजही लोकांच्या मनात जरी शिवाजी महाराजांच्या जन्मतारीख अथवा तिथीबाबत मतांतरे असली तरी व्यवस्थेसाठी हा दिवस शिवजयंती म्हणून साजरा करण्यात येतो.
महाराष्ट्रात कशी साजरी केली जाते शिवजयंती…
असं म्हणतात की, राष्ट्रपिता ज्योतीबा फुले यांनी 1869 साली रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ शोधून काढले आणि महाराजांच्या जीवनावर आधारीत पहिला आणि प्रदीर्घ पोवाडा रचला. शिवरायांचे कार्य महाराष्ट्रातील घराघरात पोहचावे यासाठी त्यांनी 1870 साली पहिल्यांदा सार्वजनिक शिवजयंतीचा कार्यक्रम पुण्यात केला. तेव्हा पासून महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी होऊ लागली. त्यानंतर पुढे लोकमान्य टिळकांनीही शिवजयंतीच्या माध्यमातून सार्वजनिक कार्यक्रमातून जनतेला एकत्र आणण्याचे कार्य केले. याचाच अर्थ असा की, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही या दिवसाला एक महत्त्वाचे स्थान आहे. विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंतीच्या कार्यात मोलाचे सहकार्य केले. ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षदेखील होते. आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते. शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने हिंदवी स्वराज निर्मिती, मराठा साम्राज्याचा इतिहास, महाराजांचे कार्य आणि महाराष्ट्राच्या दुर्गम किल्यांचा अभ्यास केला जातो.
शिवजंयती कशी साजरी करावी…
याबाबतही समाजात मतांतरे आढळतात. सध्यातरी सार्वजनिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, शिवाजी महाराजांची गाणी ऐकणे, शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करणे, सार्वजनिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, सत्यनारायणाच्या पुजेचे आयोजन, राजकीय पक्षांचे भव्य दिव्य कार्यक्रम, बाईक रॅली, सार्वजनिक ठिकाणी भव्य मिरवणूका काढून, एकमेकांना शिवाजी महाराजांचे सुविचार पाठवून, शिवाजी महाराजांची पुस्तके भेट देऊन, शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित नाटके अथवा पथनाट्याचे आयोजन करून, राजमाता जिजाबाई आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन आणि त्रिवार मुजरा करून, महाराष्ट्राच्या इतिहासावर आधारित भव्य दिव्य व्याख्यानमालांचे आयोजित करून अथवा रक्तदानासारखे सामाजिक कार्यक्रम करून छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव महाराष्ट्रात साजरा केला जातो. यंदा कोरोनामुळे मात्र हा उत्सव साधेपणाने आणि सरकारी नियमांचे पालन करत साजरा करण्याचे आवाहन केले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी काही काटोकोर नियम करण्यात आले आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आलेख पाहता शिवजयंतीचे महत्त्व या मोजक्या कार्यक्रमांपुरते मर्यादित नक्कीच नाही.
शिवजयंतीचे महत्त्व-
छत्रपती शिवाजी महाराज या युगपुरूषाला फक्त एक किंवा दोन दिवस शिवजयंती निमित्त मानवंदना देणं हे नक्कीच पुरेसं नाही. महाराजांचे कार्य इतके महान आहे की महाराष्ट्रातील प्रत्येकाने वर्षांचा प्रत्येक दिवस जरी शिवजयंती साजरी केली तरी ते कमीच पडावे. शिवरायांचा आदर्श समोर ठेवून जीवन जगणे म्हणजे खरी शिवजयंती साजरी करणे होय. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आयुष्यभर जनतेच्या कल्याणाचा विचार केला, स्वराज्य निर्मितीसाठी आयुष्य वेचले, राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांचे पालन केले, भवानी मातेची आराधना केली, महिलांना आदराचे स्थान दिले त्याचप्रमाणे प्रत्येकाने शिवरायांचे हे गुण स्वतःच्या अंगी भिनवणे म्हणजे शिवरायांना दिलेली खरी मानवंदना. ज्याप्रमाणे शिवरायांवर राम, कृ्ष्ण आणि संताच्या चरित्राचे संस्कार झाले त्याचप्रमाणे घरातील आणि लहान मुलांच्या बालमनावर शिवरायांचे संस्कार होणे म्हणजे घरोघरी साजरा केलेला शिवरायांचा जन्मोत्सव. शिवाजी महाराजांच्या मनात जनतेबाबत असलेल्या कळवळ्यामुळे त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली होती. हा इतिहास महाराष्ट्रातील लहान मुलांच्या बालमनात बिंबवला गेला तर त्यांच्या मनातही नकळत राष्ट्रप्रेम आणि भक्ती निर्माण होईल. शिवाजी राजांप्रमाणेच लहान वयात आयुष्यात काही तरी चांगलं घडवण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल. महाराष्ट्रातील घराघरात जेव्हा हा दिवस अशा पद्धतीने साजरा होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल.