नागपूर- नागपूर समृद्धी महामार्गातील शिर्डी-भरवीर या ८० किमी लांबीच्या महामार्गाचे उद्या उद्घाटन होणार आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. शिर्डी ते भारवीर हा समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आहे. उद्या या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास शिर्डी ते भरवीर अंतर ४०-४५ मिनिटांत पार करता येणार आहे.
एमएसआरडीसीने ७०१ किमी लांबीच्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू असून या ७०१ किमी मार्गापैकी ५२० किमी मार्ग डिसेंबर २०२२ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. जुलैपर्यंत भरवीर-इगतपुरी टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. या टप्प्याचे कामही सध्या वेगात सुरू आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या समृद्धी महामार्गाच्या कामास मंजुरी देण्यात आली होती. यानंतर जवळपास ८ वर्षानंतर आता हा महामार्ग पुर्णत्वास जात आहे. दरम्यान हा महामार्ग टप्प्याटप्याने तयार करण्यात येत असून यातील दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. पुढील टप्पे या दोन वर्षात पुर्ण होणार असून मुंबई ते नागपूर हा प्रवास सुखकर आणि जलद होणार आहे.