
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आपल्या शिष्टमंडळासह दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी गेले आहेत. या ठिकाणी जगभरातील गुंतवणूकदार तसेच गुंतवणूक आपल्याला मिळावी यासाठी विविध देशांचे प्रतिनिधी भाग घेतात. याठिकाणी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार इच्छुक असून अपेक्षेपेक्षा जास्त गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
याठिकाणी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये गुंतवणुकीसाठी मोठा आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म उपलब्ध होतो. यामध्ये अनेक देश आणि तिथली राज्ये सहभाग घेतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसायांचे सामजस्य करार होतात. तसेच या ठिकाणी नवं तंत्रज्ञान आणि पर्यावरणाबाबतही चर्चा होते. त्यामुळं हा एक चांगला फोरम आहे.
या ठिकाणी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक जण इच्छुक असल्याचं आम्हाला दिसलं. या ठिकाणी ओमान, युएई, दक्षिण कोरियाचे लोक आले आहेत. इतरही अनेक देशांचे प्रतिनिधी आहेत. त्याचबरोबर आपले जे उद्योगपती आहेत त्यांपैकी जिंदाल, मित्तल, अदानी देखील आले आहेत. काल आणि आज आपले चांगले सामंजस्य करारांवर सह्या झाल्या. आम्हाला अपेक्षा होती ३ लाख कोटींपर्यंत करार होतील पण काल आणि आज ४ लाख कोटींहून अधिक किंमतीचे करार झाले.
महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी गुंतवणुकदारांनी खूपच इच्छा व्यक्त केली. कारण महाराष्ट्र त्यांच्यासाठी खूपच आवडतं ठिकाण आहे. कारण महाराष्ट्रातील आपलं उद्योग धोरणं हे खूपच लवचिक असं धोरण आहे. आपल्याकडील सर्व लोक खूपच सकारात्मक, सहकार्य भावना असलेले आहेत. तसेच राज्य सरकार उद्योगांसाठी रेड कार्पेट टाकत असल्यानं अनेक गुंतवणुकदार महाराष्ट्राकडं येत आहेत असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले .


