अलिबागमधील शेकाप भवनमध्ये साधला कार्यकर्त्यांशी संवाद
अलिबाग : “शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा खंबीर आहे. पराभवाने खचणारा नाही. कष्टकरी, कामगारांसाठी लढणारा, कायम आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असणाऱ्या शेकापची भूमिका आणि धोरणे वेगळी आहेत. त्यामुळे जिल्ह्यात, राज्यात शेतकरी कामगार पक्षाने स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. विद्यमान आमदार टक्केवारी घेऊन काम करतात. ही प्रकृती वाढल्यास तालुक्याचे नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचे नुकसान होईल. शेकापने कायम संघर्षातून अस्तित्व निर्माण केले आहे. स्व. नाना पाटील, स्व. प्रभाकर पाटील,स्व. दत्ता पाटील या लढवय्या नेत्यांनी जिल्ह्यात वेगळे अस्तित्व निर्माण केले. विरोधी पक्षनेता म्हणून आजही शेकापला मान-सन्मान आहे. ही ओळख पुन्हा आपल्याला निर्माण करायची आहे. आगामी काळात खचून न जाता नव्या उमेदीने काम करू. निवडणुकीत विजय मिळवून एक वेगळा इतिहास निर्माण करायचा आहे. शेकाप पुन्हा इतिहास घडवेल,” असे प्रतिपादन माजी आ. जयंत पाटील यांनी केले.
अलिबाग येथील शेतकरी भवनमधील सभागृहात १६ जुलैला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार पंडित पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या भावना पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, माजी नगरसेविका अश्विनी पाटील, रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, माजी सदस्य संजय पाटील, साधना पाटील, तालुका शेकाप महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापुढे मार्गदर्शन करताना जयंत पाटील म्हणाले की, “राजकारणात बदल होत आहे. मतांसाठी काळाबाजार केला जात आहे. आपण मतं मिळविण्यासाठी धनशक्तीचा वापर केला नाही. पैशाचा काळाबाजार करून निवडून येणं हे आपल्या तत्वात बसत नाही, याचा अभिमान वाटतो. आगामी विधानसभा निवडणुकीत आपलाचा उमेदवार निवडून आला पाहिजे, या भूमिकेतून कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीने व मनात चिड ठेवून काम करायचे आहे.”
पंढरपूरला होणार अधिवेशन
पंढरपूर येथे शेतकरी कामगार पक्षाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन दोन दिवसीय असून २ ऑगस्ट रोजी दुपारी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.
पराभवाने अनेकांच्या डोळ्यात पाणी
नुकतीच विधान परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या आग्रहाखातर आघाडीमधून निवडणूक लढविली; मात्र ज्यांना आपण मदत केली, त्यांनीच आपली फसवणूक केली. आपल्या पराभवामुळे विधान परिषदेतील शिपायापासून ते सचिवापर्यंत अनेकांच्या डोळ्यातून पाणी आले. हाच आपला सन्मान आहे. पण कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. आपण वेगळ्या उमेदीने पुन्हा उभे राहू. ज्यांना आपण मोठे केले, त्यांनी फसविले आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षाची वेगळी भुमिका असणार आहे. वेगळी ध्येय-धोरणे घेऊन काम करण्याची भूमिका घ्यावी लागेल. आपली बांधिलकी गोरगरीबांसोबत आहे. त्यांना केंद्रबिंदू मानून कार्यकर्त्यांनी काम करणे आवश्यक आहे. आगामी निवडणूकीत विजय मिळवून एक वेगळा इतिहास निर्माण करायचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
“जे फितूर होतात, त्यांना त्यांची जागा दाखविणे आवश्यक आहे. असा विजय मिळवा, की पुन्हा विरोधक उभा राहणार नाही. येत्या २ ऑगस्ट रोजी पंढरपूरच्या मंदिरात नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात करू या. त्यामुळे या अधिवेशनाला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असेही आवाहन त्यांनी केले.
गद्दारी, लाचारी आमच्या रक्तात नाही
माजी आ. पंडित पाटील म्हणाले, “देशासह राज्यातील राजकारण बदलत आहे. धनशक्ती विरूध्द जनशक्ती अशी लढाई सुरू आहे. आपण ज्यांना मदत केली, त्यांनीच आपल्याशी गद्दारी केली आहे. त्याचा राग ठेवून कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून कामाला लागा. गद्दारी, लाचारी हे आपल्या रक्तात नाही. गोरगरिबांचा, कष्टकऱ्यांचा आवाज आज सभागृहात कडाडणार नाही, हे संपूर्ण राज्याचं नुकसान आहे. आज शेकापच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी संपूर्ण सरकारला ताकद लावावी लागते, हाच आपला विजय आहे. पराभवाने खचणारा आणि विजयाने उन्मत्त होणारा शेकापचे कार्यकर्ता नाही. आगामी निवडणूकीत आपला विजय झाला पाहिजे. या दृष्टीने प्रत्येकाने काम करा. शेकापचे नेते जयंत पाटील लवकरच विधान परिषदेचे आमदार होतील. ज्याप्रमाणे आज त्यांच्या स्वागतासाठी तयारी केली आहे, त्याप्रमाणे आमदार झाल्यावर त्यांच्या स्वागतासाठी सज्ज रहा.”