राजस्थान – राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात खळबळजनक घटना समोर आली आहे. पतीने आपली पत्नी चेटकीण असल्याचं सांगून तिला गरम चिमट्याने चटके दिल्याची भयंकर घटना घडली आहे. पीडित महिला पोलीस स्टेशनमध्ये चालवल्या जाणार्या महिला सुरक्षा आणि समुपदेशन केंद्रात पोहोचली आणि तिच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत माहिती दिली. तिने पतीपासून तिला वाचवण्याची विनंती केली. पतीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीच्या छळाला कंटाळून २८ वर्षीय महिला तिच्या गावी आली. तिथे तिने सरपंच बंशीधर यांना आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. त्यानंतर सरपंच बंशीधर यांनी पीडितेला चुरू महिला पोलिस स्टेशनमध्ये चालवण्यात येणाऱ्या महिला सुरक्षा केंद्रात पाठवले. येथे महिलेने सांगितले की, ११ वर्षांपूर्वी तिचे लग्न सुजानगड तहसीलमधील गोपालपुरा गावात राहणाऱ्या शेरारामसोबत झालं होतं. तिच्या नवऱ्याला दारूचं व्यसन आहे.
दारू पिऊन पती पैशाची मागणी करतो, असा पीडितेचा आरोप आहे. भांडणही करतो, मारहाण करतो. महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या पतीने तिला चेटकीण म्हटले आणि गरम चिमट्याने तिच्या अंगावर चटके दिले. ११ जून रोजीही आरोपी पतीने दारू पिऊन मारहाण केली. नंतर ती भूत असल्याचं सांगून तिच्या पाठीवर गरम चिमट्याने चटका दिला.
महिलेने सांगितले की, ती ओरडत राहिली पण तिच्या पतीवर काहीही परिणाम झाला नाही. ती रडत असताना तो हसत होता. त्यानंतर पतीने तिला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. यानंतर तिने आपल्या बहिणीला हा प्रकार सांगितला. बहिणीने तिला गावचे सरपंच बंशीधर यांच्याकडे नेले. सरपंचाने दोघींना घीं ही महिला पोलीस ठाण्यात चालवल्या जाणाऱ्या महिला सुरक्षा व समुपदेशन केंद्रात नेले. पतीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पीडितेने केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.