
पुणे- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यातील बालगंधर्व मंदिर याठिकाणी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी चर्चा केली. दरम्यान पत्रकारांनी पंतप्रधान होण्याबाबत शरद पवारांना काय वाटतं, असा प्रश्न विचारताच त्यांनी आपलं मत स्पष्ट सांगितलं.
शरद पवार म्हणाले, ‘पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी अजिबात नाही.आम्हाला या देशात स्थिर आणि विकासाला प्रोत्साहित करणारे नेतृत्व हवे आहे.उद्या जनतेने उत्तम प्रकारची साथ दिली,तर त्यातून देशहित जपणारे नेतृत्व समोर आणू. माझ्यासारख्याची जबाबदारी आहे की अशा नेत्यांना पूर्ण साथ देणे आणि मदत करणे.मी पुढची निवडणूकच लढवणार नाही,मग पंतप्रधान पदाचा संबंधच येत नाही,असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
दरम्यान पाहायला गेलं तर, शरद पवार यांचा राष्ट्रीय राजकारणात दबदबा आहे. विरोधकांची मोट बांधण्याकरताही त्यांच्या नेतृत्त्वाची गरज असल्याचंही म्हटलं जातंय.त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जर विरोधकांच्या ऐक्याला बळ मिळालं तर शरद पवार पंतप्रधानांचा चेहरा असतील,अशी चर्चा आहे. परंतु, या सर्व चर्चा शरद पवारांनी धुडकावून लावत या चर्चांना पुर्णविराम दिला.