पंढरपूर- गेल्या आठवडाभर राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. ज्याचे केंद्रबिंदू ठरले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर हा संपूर्ण वाद थंड झाला होता. या राजीनामा नाट्यानंतर शरद पवार हे आज पंढरपूर, सांगोला दौऱ्यावर आहेत. यावेळी शरद पवारांच्या आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायोगॅस सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन झाले.
तसेच कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्यामध्ये त्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणूकीसंदर्भात मोठे विधान केले असून कर्नाटक राज्यात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचे ते म्हणाले आहेत.
कर्नाटकमध्ये सध्या विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणूकांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. सध्या फक्त ५ ते ७ राज्यांंमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. देशभरात भाजपची घसरण सुरू असून कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच कर्नाटकातील जनता भाजपवर नाराज असल्याचंही ते म्हणाले आहेत.
विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. वर्षभरापूर्वी भालके गटाचा पराभव करून अभिजीत पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बनले आहेत. त्यामुळे शरद पवार यांची ही आगामी विधानसभेसाठी मोठी खेळी7 असल्याचे बोलले जात आहे.