पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या घडामोडींनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ‘मला पक्षाची चिंता नाही, गेलेल्यांच्या भविष्याची चिंता आहे. माझा महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे. पुन्हा पक्ष उभा करणार, असा आत्मविश्वास पवारांनी बोलून दाखवला.
जे मंत्री झाले, त्यांची माहिती घ्या. त्यांना उभं कोणी केलं याची माहिती घेतली तर सर्व काही कळेल. मोदींनी काय करावं हा त्यांचा प्रश्न. त्यांना जे योग्य वाटतं, ते मोदी करतील. ते लोकांना पटतं का हे महत्त्वाचं आहे. आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करणार आहोत. आजच आमची चर्चा झाली. अन्य पक्षांशी सुद्धा राष्ट्रीय पातळीवर एकत्र येण्याचा जो प्रयत्न करतोय, तिथंही अधिक आक्रमक होण्याची आमची भूमिका आहे. शपथविधीचा कार्यक्रम बघितला. आताचे मंत्री आणि भाजपच्या लोकांचे चेहरे चिंताजनक होते – शरद पवार
आम्ही कुठलीही कायदेशीर लढाई लढणार नाही. आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ, असे शरद पवार म्हणाले.
सत्तेमुळं त्यांची चार-दोन कामं होतील. पण शेवटी लोकांचा पाठिंबा महत्त्वाचा असतो. अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना लोकांच्या पाठिंब्याची चिंता आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. माझं अजिबात कुणाशीही बोलणं झालेलं नाही. जे तिथं गेले ते विधानसभेचे सदस्य होते. काही लोकांनी मला फोन केला. नाईलाजानं आम्ही सह्या केल्या. ज्यांनी शपथ घेतली, त्यापैकी फक्त छगन भुजबळ माझ्याशी बोलले. मी जातो काय नेमकं चाललंय ते बघतो आणि नंतर कळलं त्यांनीच शपथ घेतली. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नियुक्ती मी केली होती. त्यांनी आपली जबाबदारी योग्य रितीनं पार पाडली नाही. त्यांच्यावर नेतृत्वाचा विश्वास राहिलेला नाही. त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल, असेही शरद पवार यांनी सांगितले.
अजित पवार व अन्य लोकांनी जे केलं तो पक्षाचा धोरणात्मक निर्णय नाही. पक्षाचे प्रमुख लोक बसतील आणि त्यावर निर्णय घेतील. आमची खरी शक्ती सामान्य माणूस आणि कार्यकर्ता आहे. ज्यांच्याशी लढलो, त्यांच्याबरोबरच गेलो ते ते अस्वस्थ होणारच. त्यांना विश्वास देऊन संघटना पुन्हा बांधणार. विरोधी पक्षनेते पदाच्या नावाची शिफारस आम्ही लवकरच करू. तो काँग्रेसचा, ठाकरेंच्या पक्षाचा किंवा राष्ट्रवादीचाही असू शकतो. अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मला आत्ताच कळतेय. त्यावर मी भाष्य करणार नाही. पक्षाबद्दल कोणी काहीही दावा करो. माझा लोकांवर विश्वास आहे. आम्ही लोकांसमोर भूमिका मांडू. माझी खात्री आहे, त्यांचा पाठिंबा मिळेल, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटले.
शरद पवार पुढे म्हणाले कि, उद्या सकाळी मी बाहेर पडणार आहे. कराडला जाऊन यशवंतराव चव्हाणाचंं दर्शन घेऊन दलित समाजाचा पहिला मेळावा घेणार आहे. राज्यात आणि देशात जितकं जाता येईल, तितकं जाईन. मला महाराष्ट्रातून फोन येतायत. लोक पाठिंबा देतायत. ममता बॅनर्जी, खर्गे यांचा फोन आला. जे काही घडलं त्याची मला चिंता नाही.
माझा महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेवर, विशेषत: तरुण पिढीवर माझा पूर्ण विश्वास आहे. २०१९ लाही असंच झालं होतं. पण आमचे चांगले आमदार निवडून आले. दोन दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी एक विधान केलं होतं ते काँग्रेसच्या विरोधात होतं, त्यानंतर राष्ट्रवादीबद्दल होतं. त्यात दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या की राष्ट्रवादी भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. हे सांगत असताना त्यांनी राज्य सहकारी बँकेचा उल्लेख केला. त्याबरोबर सिंचनातील तक्रारीचा उल्लेख केला. हा उल्लेख त्यांनी केल्यानंतर आज मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या काही लोकांना शपथ दिली. याचा अर्थ त्यांचे आरोप खरे नव्हते. त्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्यावर आरोप केले होते, त्यांना मुक्त केलं. त्याबद्दल त्यांचा आभारी आहे, असं शेवटी शरद पवार म्हणाले.