मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. एका सोशल मीडिया अकाऊंटवरून शरद पवारांसह शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवारांना उद्देशून ‘तुमचाही दाभोलकर होणार’, अशी पोस्ट या सोशल मीडिया अकाऊंटवरून करण्यात आली आहे. या धमकीबरोबरच शरद पवारांना अश्लाघ्य भाषेत शिवीगाळही करण्यात आली आहे. ही गंभीर बाब असून याकडे गृहविभागाने लक्ष द्यावं, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
शरद पवारांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विरोधी पक्ष राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि गृह विभागावर टीका करत असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी परंपरा आहे. आमचे राजकीय पातळीवर मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवर कोणतेही मनभेद नाहीत. सोशल मीडियावर व्यक्त होत असताना कोणत्याही नेत्याला धमकावणं किंवा सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणं ही बाब खपवून घेतली जाणार नाही’. दरम्यान, अशा प्रकरणात पोलीस नक्कीच कायदेशीर कारवाई करतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
काय आहे धमकीमध्ये?
शरद पवारांना आलेल्या धमकीसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. ‘गृहमंत्रालयाने याची नोंद घ्यावी. मी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना यासंदर्भात माहिती दिली आहे. शरद पवारांना ज्या पद्धतीने ही धमकी आली आहे. ते दुर्दैवी आहे’, असं सुप्रिया सुळे प्रसारमाध्यमांना म्हणाल्या आहेत. धमकी देणाऱ्या ट्वीटमध्ये शरद पवारांना शिवीगाळ करून पुढे “तुमचाही दाभोलकर होणार”, असा उल्लेख करण्यात आला.