वयाचा उल्लेख कराल तर, महागात पडेल; शरद पवार गटाचे येवल्यात जोरदार शक्तीप्रदर्शन
नाशिक ,08 जुलै- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंडखोरीनंतर शरद पवारांची नाशिकच्या येवल्यात आज सभा पार पडली. यावेळी शरद पवार गटाने येवल्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. शरद पवारांसह खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांचे यावेळी जंगी स्वागत करण्यात आले. मी येथे कोणावर टीका करण्यासाठी आलो नाही, मात्र काही नेत्यांबाबत माझा अंदाज चुकला, यासाठी माफी मागायला आलो आहे, असे शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर शरद पवार यांनी राज्यव्यापी दौरा सुरू झाला आहे. त्याची सुरूवात नाशिकमधील येवल्यातून झाली आहे. या सभेत जनतेला संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, “राष्ट्रावादीच्या अनेक नेत्यांनी बंड केले असला तरी काही सहकाऱ्यांनी अजूनही माझी साथ सोडली नाही. मी येथे कोणावरही टीका करण्यासाठी आलो नाही. परंतु, काही नेत्यांबाबत माझा अंदाज चुकला, यासाठी माफी मागण्यासाठी आलो. वयाचा उल्लेख कराल तर, महागात पडेल”, असा सूचक इशारा शरद पवार यांनी बंडखोरांना दिला आहे.
पुढे शरद पवार म्हणाले की, “राजकारण हे सामन्य जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी केले पाहिजे. याच उद्देशाने आम्ही पुढे चाललो. आम्ही वेळोवेळी वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन घेतले. येवल्यातील मतदारसंघाचा इतिहास मोठा आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या तात्या टोपे यांची ही भूमी आहे. या भूमीतील लोक कितीही अडचणी, संकट, दुष्काळ आला तरी ती स्वाभिमान सोडणार नाहीत. या स्वाभिमानी लोकांना पुन्हा शक्ती देण्याची गरज आहे. यासाठी आम्हाला अधिक जबाबदारी घ्यावी लागेल”, असेही शरद पवार म्हणाले.