बारामती : निवडणूक आयोगाने शिवसेना व धनुष्यबाणासंबधी दिलेल्या निकालावर चर्चा करता येणार नाही. या निकालाने फारसा फरक पडेल असेही वाटत नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातील पक्षचिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने दिल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
बारामतीत पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, या निकालामुळे ठाकरे यांच्या गटाला आता नवीन चिन्ह घ्यावे लागेल. कॉंग्रेसमध्ये एकदा वाद झाला होता. त्यावेळी कॉंग्रेसची बैलजोडी ही खूण होती. त्यांनी पंजा हे चिन्ह घेतले. त्यामुळे काही फरक पडला नाही. लोकांनी ते स्विकारले आताही फरक पडणार नाही. काही दिवस चर्चा होईल. नंतर लोक विसरुन जातील, असे पवार म्हणाले.