ठाणे : आम्ही कुठलेही गैरकृत्य केलेले नाही, उध्दव ठाकरे यांचा कोणताही आदेश मोडलेला नाही. आदेश मोडला असता, तर संजय राऊत खासदार झाले नसते. उलट ते आम्हाला गद्दार म्हणत आहेत, मात्र ते कदाचित विसरले आहेत की, ते आमच्या मतांवर निवडून आलेले आहेत, हिंमत असेल तर राऊत यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा राज्यसभेवर निवडून दाखवावे, अशा शब्दांत मंत्री शंभूराज देसाई यांनी राऊत यांना आव्हान दिले.
ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला देसाई हजर होते. ते म्हणाले की, शिवसेनेमध्ये लोकप्रतिनिधींचे बहुमत हे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आहे. ५५ पैकी ४० आमदार, १८ पैकी १३ खासदार शिंदे यांच्याबरोबर आहेत. बहुसंख्य नगरसेवक, जिल्हाप्रमुख शिंदे यांच्याबरोबर आहेत, त्यामुळे बहुमत आमच्याबरोबर आहे. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. ज्या शिवसेनेने भाजपबरोबर नैसर्गिक युती करून २०१९ च्या निवडणुका लढवल्या. निवडणूक लढवताना मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून मते मागून निवडून आले. आम्ही इथे बसलेले आमदार आहोत. त्यामुळे लोकांचे मॅन्डेट आमच्या बाजूने होते, मात्र मागच्या अडीच वर्षांत जे घडले ते लोकशाहीला धरून नव्हते.
शंभूराज देसाई म्हणाले की, घटनेच्या, कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही भूमिका घेतली आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या घटनेत ज्या तरतुदी आहेत, त्यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास आहे. आमची न्यायाची बाजू आहे, त्यामुळे १४ फेब्रुवारी रोजी आम्हालाच न्याय मिळेल.
जाहिरात :