
सांगली :- अनेक गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या अजित पवारांना पुढील अध्यक्ष करु नये, असं खळबळजनक विधान शालिनीताई पाटील यांनी केलं आहे. अजितदादांच्या पाठीशी भाजपच्या बड्या नेत्याचा हात असल्याने ईडी चौकशीपासून अजित पवार बचावले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
आमदार हसन मुश्रीफ यांना १०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशीसाठी बोलावले जाते, मात्र अजित पवारांना १४०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडी का बोलवत नाही ? असा सवाल शालीनीताई पाटील यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना, सुप्रिया सुळे यांना पुढचा अध्यक्ष म्हणून नेमावं, कारण त्या या पदासाठी सक्षम आहेत, असंही शालीनीताई यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घाईत घेतला. त्यांनी राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारुन हा निर्णय घ्यायला हवा होता. पवार यांनी जरी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असेल तरीही समितीचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत हा निर्णय ग्राह्य मानला जाणार नाही. मी ९० वर्षांची असून शरद पवार माझ्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहेत. मी अजूनही माझं कामकाज व्यवस्थितरित्या सांभाळते, त्यामुळे पवारांनी एवढ्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती, असं मत शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केलं.