पन्हाळ्याच्या पायथ्याशी म्हाळुंगे गावातील एका फार्म हाऊसवर वेश्याव्यवसाय…
कोल्हापूर : वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणलेल्या तीन महिलांची सुटका करत फार्म हाऊस चालकासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोल्हापुरातील पन्हाळ्याच्या पायथ्याशी मसाई पठाराकडे जाणाऱ्या रोडवरील महाळुंगे या गावात एका फार्म हाऊस वर छापा टाकण्यात आला. यावेळी सेक्स रॅकेटमधून तिघी जणींची सुटका करण्यात आली.
फार्म हाऊस चालक संशयित आरोपी सुरज विश्वास वरेकर (राहणार म्हाळुंगे), प्रसाद आनंदा वरेकर (राहणार म्हाळुंगे) आणि रवींद्र पांडुरंग कर्ले असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर छाप्यामध्ये ताब्यात घेतलेल्या महिलांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, म्हाळुंगे गावातील एका फार्म हाऊसवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिक तपास केला असता फार्म हाऊस चालक संशयित आरोपी सुरज विश्वास वरेकर हा मध्यस्थी रवींद्र कर्ले याच्यामार्फत महिलांना आपल्या फार्म हाऊसवर वेश्या व्यवसायासाठी आणत असल्याचे पोलिसांना समजले.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास फार्म हाऊसवर छापा टाकला. यावेळी पोलिसांना तीन महिलांसह रविंद्र कर्ले, सुरज वरेकर, प्रसाद वरेकर हे वेश्या व्यवसाय करत असताना मिळून आले. दरम्यान तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत संबंधित महिलांची सुटका करत त्यांना सुधारगृहात पाठवले असल्याचे पन्हाळा पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी सांगितले.